काका की पुतण्या? कोणाचं अस्तित्त्व टिकणार? राजकीय भवितव्य पणाला, बारामतीत धाकधूक वाढली

बारामती: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी ४ जूनला येणार आहे. मतदारांनी कोणाला कौल दिला हे त्यात स्पष्ट होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय अशी लढत झाली. पण, खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच झाली. आता मतदारांनी दिलेला कौल मंगळवारी जाहीर होईल. पण, या कौलावरच बारामतीत या दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असेल.

गत वर्षी २ जुलैला राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत उपमुख्यमंत्री पद मिळविले. पवार कुटुंब फुटल्याने देशभर त्याची चर्चा झाली. पक्ष फुटल्यावर बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व दिसून आले. साखर कारखाने, बॅंक, दूध संघ, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा मोठ्या संस्था त्यांच्याकडे राहिल्या. अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते अजित पवार यांच्याच पाठीशी असल्याचे पक्ष फुटीनंतर दिसून आले. त्यामुळे शरद पवार गटासाठी येथे सुरुवातीला ना पदाधिकारी ना कार्यकर्ते अशी स्थिती होती.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे लढणार हे तर निश्चित होते. अजित पवार यांच्याकडून कोण लढणार हे नक्की नव्हते. पुढे सुनेत्रा पवार यांचे नाव समोर आले. नणंद-भावजयीमध्ये अटीतटीचा सामना रंगला. पक्षफुटीनंतर ज्या शरद पवार गटाकडे पदाधिकारी, कार्यकर्ते नव्हते, तिकडे सामान्य कार्यकर्त्यांची रिघ लागली. दुसरीकडे, संस्थांशी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्याकडे राहिले. निवडणूक अशी दोन भागात विभागली गेली. त्यातून सर्वसामान्य लोक सुळेंकडे तर पदाधिकारी, नेते मंडळी सुनेत्रा पवार यांच्याकडे अशी स्थिती मतदानापर्यंत दिसून आली.

तर अजित पवारांसाठी धक्का…

आता निकाल जाहीर झाल्यावर त्याचा फटका कोणाला बसतो, हे पहावं लागेल. सुळे यांचा विजय झाला तर अजित पवार यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल. पराजय झाला तर शरद पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेला तडा जाईल. यामुळे बारामतीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

मतदानावेळी येथे शहर, तालुक्यात अजित पवार यांची यंत्रणा अधिक सक्षम असल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील फक्त बारामती विधानसभा क्षेत्राचा विचार करता येथे सुनेत्रा पवार यांना मताधिक्य राहिल असे बोलले जात आहे.