करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये पाणी पुरवठा बंद
दरम्यान, ही पाणी कपात सुरू असतांना आता पाइपलाइन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही भागात गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी यांची दखल घ्यावी, व पाणी साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये ६, ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व जुन्या व जीर्ण जलवाहिण्या बदलण्यासाठी विविध देखभाल दुसरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामा अंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केली जाणार आहे. या कामामुळे जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जूनला रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पाणी जपून वापरा
या कामासाठी तब्बल १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने या दरम्यान करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ येथील पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी कपात लागू असणाऱ्या भागात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा
राज्यात असलेल्या बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलसंकट अधिक गडद झाले आहे. मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जात आहे. संभाजीनगर येथे तर पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यात अद्याप मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.