पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र याउलट स्थिती असून महायुतीला महाविकास आघाडीने तगडी टक्कर दिलेली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधी लाटेचा आणि सहानुभूतीच्या फॅक्टरचा पुरेपूर वापर करून निवडणुकीत रंगत आणली. पश्चिम महाराष्ट्र हा साखर पट्टा म्हणून ओळखला जातो. इथे दूधसंघ, सूतगिरण्यांचा देखील राजकारणावर मोठा प्रभाव पडतो. या संस्था टिकवायच्या असतील तर सरकारचे पाठबळ असणे महत्त्वाचे असते. त्याचमुळे ज्या पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी राष्ट्रवादीचा बोलबोला होता, तिथे भाजपचा शिरकाव झाल्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाणे पसंत केले. परंतु या निवडणुकीत शरद पवार यांनी राजकीय डाव टाकून चाणाक्षपणे बेरजेचे राजकारण केले. त्याचाच परिणाम म्हणून मतदानोत्तर चाचण्यांमधून पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांना साथ देईल, असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बारामती, शिरूर, माढा आणि साताऱ्यात तुतारीचा आवाज घुमण्याची शक्यता
बारामती, शिरूर, माढा, सातारा, अहमदनगर दक्षिण, बीड, दिंडोरी, रावेर, भिवंडी आणि वर्धा या जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांच्या वाट्याला आल्या. या जागांवरील अनुक्रमे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, शशिकांत शिंदे, नीलेश लंके लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर गुलाल उधळतील, असे साधारण अंदाज आहेत.
बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीत शरद पवार वरचढ ठरण्याची शक्यता असून सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांना मात देतील, असा कल आहे. बारामती लोकसभेतील प्रमुख नेते सुप्रिया यांच्या बाजूने नसतानाही सुप्रिया सुळे विजयश्री खेचून आणतील, हे विशेष आहे. शेजारी शिरूरमध्ये लोकसभेच्या तिकीटासाठी पक्षांतर केलेल्या आढळरावांविरोधात जनतेची नाराजी असून त्याचा फायदा पवारांवर निष्ठा दाखविलेल्या अमोल कोल्हे यांना होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी कोल्हेंवर मतदारसंघातील जनता नाराज होती. निवडून आल्यानंतर जनतेशी संपर्क ठेवला नसल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून आक्रमक भूमिकांनी कोल्हे पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर आले.
साताऱ्यात राजा विरुद्ध प्रजा या लढतीत माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना जनतेची पसंती मिळणार असल्याचे चित्र आहे. राज्यसभेची तीन वर्षे शिल्लक असतानाही लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजेंना जनतेची साथ यंदाही मिळणार नसल्याची चर्चा आहे. शेजारी माढ्यात भाजपला धक्का देऊन शरद पवार यांच्या तालमीत आलेल्या धैर्यशील मोहिते माहिते यांच्या अंगावरही गुलाल पडण्याची शक्यता आहे. खासदार नाईक निंबाळकर यांच्या कामावर नाखूश असलेली जनता, भाजपविरोधातील रोष मोहिते पाटलांच्या पथ्यावर पडलेला दिसून येण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्राला लागूनच असलेल्या नगर दक्षिणमध्ये विखे बापलेकांच्या महाशक्तीविरोधात नीलेश लंके यांनी जनतेच्या जोरावर तगडी टक्कर दिली. मतदारांना लंके यांचा साधेपणा जनतेला भावलेला असून मतदानोत्तर चाचण्यांनुसार ग्रामीण भागांतून त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याने ते लोकसभेत एन्ट्री करतील, असा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात मागील कित्येक दशकापासून विखेंची मोठी ताकद आहे. याच ताकदीला लंके सुरूंग लावण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये काय होणार?
मराठवाड्यातील बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांची लेक पंकजा मुंडे यांना तगडी फाईट दिलेल्या राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणे यांचीही जोरदार चर्चा होत आहे. टीव्ही ९ आणि पोलस्ट्रार्टच्या अंदाजानुसार पंकजा मुडे विजयी होतील, असे संकेत आहेत. परंतु पंकजा मुंडे यांना पराभूत करून बाप्पा जाएंट किलर ठरतील, असे सोनवणे यांचे समर्थक सांगत आहेत. सतत दुष्काळाची छाया असलेल्या बीड लोकसेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला सारून जातीवर गेलेल्या निवडणुकीत मराठा-वंजारी मतांचे झालेले ध्रुवीकरण बाप्पांच्या पथ्यावर पडेल, असे सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव बीडच्या निवडणुकीवर पडून बाप्पा विजयी तुतारी फुंकतील, असाही अंदाज समाजमाध्यमांवर लावला जातोय. बऱ्याचअंशी एकगठ्ठा मराठा मते बाप्पांना मिळून ते विजयश्री खेचून आणतील, असेही जाणकार सांगत आहेत.
दिंडोरीत विजयी तुतारी वाजणार?
उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरीमध्ये कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय संपूर्ण निवडणुकीवर परिणाम करणारा ठरला. राष्ट्रीय मुद्दे आणि विकासापेक्षाही कांदा व शेतीचे प्रश्न आणि आदिवासींची होत असेलल परवड हे स्थानिक मुद्दे इथे वरचढ ठरले. केंद्रीय मंत्री भारती पवार मोदींच्या राजवटीतील ‘विकासकामे’ सांगत राहिल्या. पण भास्कर भगरे गुरूजी यांनी निवडणुकीच्या शेवटापर्यंत कांदा आणि द्राक्षाच्या प्रश्नाला तडका देतानाच मोदी सरकारच्या काळात कृषी धोरणांचा उलट प्रवास सुरू झाल्याचे सांगून ‘रान’ उठवले. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग दिंडोरीत असल्याने यंदाच्या साली भगरे यांच्या रुपाने विजयाची तुतारी वाजेल, असा अंदाज आहे.
वर्ध्यात पुन्हा तडस?
तिकडे विदर्भातील वर्ध्यात अमर काळे यांच्या प्रचाराला शरद पवार यांच्यासह अनिल देशमुख, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे तसेच विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. अमर काळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रामदास तडस यांना तगडी फाईट दिली. परंतु येथील मतदार पुन्हा तडस यांनाच लोकसभेत जाण्याची संधी देतील, असा अंदाज आहे.
भिवंडीत बाळ्या मामांचे भविष्य निलेश सांबरे यांच्या हाती!
इकडे मुंबईला लागून असलेल्या भिवंडी मतदारसंघात काही प्रमाणात काँग्रेसचे प्राबल्य असूनही शरद पवार यांनी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले. सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यातच म्हात्रे यांची निम्मी ऊर्जा खर्च झाली. समोरील प्रतिस्पर्धी उमेदवार कपील पाटील यांनी मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केल्याने त्यांना मतदारसंघातील खाचखळगे माहिती होते. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे निलेश सांबरे यांनी कपील पाटील यांचे काम हलके केल्याची चर्चा आहे. सांबरे किती मते घेतात, यावर बाळ्यामामांचे भविष्य अवलंबून आहे.