पतंग उडवाताना नाशिकमध्ये दुर्घटना
मकर संक्रांतीचा सण होऊन आता आठ दिवस उलटून गेले आहेत, मात्र तरीही देशभरात आजही पतंग उत्साहाने उडवले जात आहे. रंगीबेरंगी, छोटे-मोठो , सर्वच आकाराचे पतंग उडवणं हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं. मात्र तोच पतंग उडतवाताना कधीकधी दुर्घटनाही होत असतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, दुर्घटना होणे, बाईकस्वारांना मांजा लागून अपघात होणे, पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडत असतात, तर बऱ्याच जणांना पतंग उडवताना काळ-वेळेचेही भान उरत नाही. अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.
पतंग उडवताना गच्चीवरून तोल जाऊन पडल्याने अवघ्या 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. सोमवारी दुपारी नाशिकच्या काठे गल्ली परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, नक्ष संदीप बनकर असे दुर्दैवी घटनेतून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. नक्ष हा रवींद्र विद्यालयामध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
एसएमबीटीजवळ हॉस्पिटलजवळ भीषण अपघात, तिघे ठार
घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा (NL01 AF 0458) कंटेनर दिसला नाही आणि ती रिक्षा कंटेनरला धडकली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला.
ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे वय ४, मार्तंड पिराजी आव्हाड वय ६० यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. प्रतीक्षा अमोल घुगे वय २२, कलावती मार्तंड आव्हाड वय ५८, रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय २८ रा. झारखंड याला तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी पुढील तपास कसून सुरु केला आहे.