‘हिंजवडीतील प्रकल्प राज्याबाहेर गेलेले नाहीत तर….’ उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील हिंजवडीतील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या विरोधकांच्या आरोपांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. हिंजवडीतील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नसून त्यांचे स्थलांतर झाले आहे, असे ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याचवेळी भविष्यात महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प येणार असल्याचा दावा करतानाच महाविकास आघाडीच्या काळात ५० हजार कोटींच्या एनर्जी प्रकल्पाबाबत केलेल्या सांमजस्य कराराचे काय झाले, याचा खुलासा करण्याचे आव्हान सामंत यांनी आघाडीला केले.

पुण्यातील हिंजवडी येथून जवळपास ३७ आयटी कंपन्या बाहेर गेल्याचा आरोप विरोधकांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून केला आहे. या आरोपांना सामंत यांनी उत्तर दिले. हिंजवडी येथून ज्या कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत, त्याची यादी जाहीर करतानाच हे उद्योग राज्याबाहेर गेलेले नाहीत. असे आरोप म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या उद्योगजगताची जाणीवपूर्वक बदनामी करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडीत तयार झाली असल्याची टीका सामंत यांनी यावेळी केली. राज्यात वाढलेली परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर करतानाच उद्योगांकडून राज्याला पसंती दर्शविली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृपया राज्याबाहेर जाऊ नका, पुण्यात अडचणी असतील तर ‘आमच्या शहरात या’

ज्या ३७ कंपन्या राज्याबाहेर गेल्याचा आरोप होत आहे त्यातील २१ कंपन्या या अगोदरच स्थलांतरित झाल्या आहेत. परंतु त्या राज्याबाहेर गेलेल्या नाहीत. त्या राज्यातच आहेत. महाविकास आघडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात २०२०मध्ये सहा, २०२१मध्ये तीन आणि २०२२मध्ये चार अशा एकूण १३ कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. यातील १६ कंपन्यांची यादी माझ्याकडे असून त्या महाराष्ट्रातच इतरत्र गेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. हिंजवडी येथील संघटनेशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्या समस्यांबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘तीन दिवसांचे पंतप्रधान’

लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यातील मतदान शनिवारी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे विरोधकांनी म्हटले आहे. त्यावर सामंत यांनी टीका केली. फक्त मानसिक समाधान मिळण्याकरिता हा दावा करण्यात आला आहे. जो कोणी पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल तो तीन दिवसांसाठीच असणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा, असा टोलाही सामंत यांनी लगावला. महायुतीचा विजय निश्चित असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.