महाविकास आघाडीची एकीची वज्रमूठ, भाजपला दणका बसणार? राज्यातील धक्कादायक एक्झिट पोल

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फूट, सत्ताधाऱ्यांविरोधातील कमालीची नाराजी, वाढती बेरोजगारी, पिकांचे पडलेले भाव, जीएसटीमुळे त्रस्त झालेला व्यापारी वर्ग तसेच संविधान बदलण्याच्या प्रचार अशा सगळ्या मुद्द्यांभोवती फिरलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे शनिवारी सायंकाळी समोर आले. या चाचण्यांतून महाराष्ट्रात भाजपला तसेच मित्रपक्षांना मोठा धक्का बसू शकतो, असे अंदाज वर्तवले आहेत. तर अस्तित्वासाठी लढणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारून भाजपला राज्यात रोखल्याचे चित्र आहे. एबीपी सी व्होटर आणि टीव्ही ९ पोलस्टार्टने याबाबतचे आकडे प्रसिद्ध केले आहेत.

मतदानोत्तर चाचण्यांमधून राज्यातील जनतेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे बंड रुचले नसल्याचे चित्र आहे. कारण एबीपी- सीव्होटर आणि टीव्ही ९ पोलस्ट्रार्टच्या चाचण्यांच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजपच्या जागाही कमी होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे पक्ष फुटीनंतरही त्वेषाने लढलेल्या ठाकरे पवार यांना जनतेची पसंती मिळाल्याचे चित्र आहे.

एबीपी- सीव्होटरच्या एक्झिट पोलमध्ये काय?

महायुती २२-२६ (भाजप-१७ , शिंदे गट-०६, अजित पवार गट ०१)
महाविकास आघाडी २३-२४ (ठाकरे गट-०९, शरद पवार गट-०६, काँग्रेस ०८)
अपक्ष-१
Maharashtra Election Exit Polls 2024 Live Updates : राणे-गडकरी आगे, पण महायुतीचे ९ स्टार उमेदवार मागे, एक्झिट पोलचे अंदाज काय?

टीव्ही ९ पोलस्ट्रार्टच्या एक्झिट पोलमध्ये काय?

महायुती २२ (भाजप- १८, शिंदे गट-०४, अजित पवार गट-००)
महाविकास आघाडी २५ (ठाकरे गट- १४, शरद पवार गट-०६, काँग्रेस ०५)

महत्त्वाचं म्हणजे ठाकरे आणि पवारांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमालीचा चांगला फरफॉर्मन्स करेल, असे बोलले जात आहे. कारण सध्या काँग्रेसकडे एकच जागा असताना सध्याच्या चाचण्यांमधून त्यांना ०६ ते ०८ जागा मिळू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.