ऐन उन्हातान्हात प्राणी सुखावले! बारामतीत वसले मुक जनावरांचे गाव

बारामती : उन्हाळ्यातील प्रचंड वाढलेला तापमानाचा पारा. असह्य झालेलं ऊन आणि गावात पाण्याचं आणि चाऱ्याचं दुर्भिक्ष यामुळे आजवर जोपासलेली, तळहाताच्या फोडासारखी जपलेली जनावरे या उन्हाळ्यात धरतील का? असा प्रश्न गावातल्या गोपालकांपुढे निर्माण झाला आणि या शेतकऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा एक छोटसं उपोषण केलं. आपली जनावरे टिकली पाहिजेत, यासाठी ही माणसं डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतिक्षा करत राहिली. निवडणुका आल्या, प्रचार झाला, रॅली झाल्या, कोणीतरी आपल्याकडे पाहिल असं त्यांना वाटलं पण शेवटी माणुसकीचं नातच समोर उभ राहिलं.

भारतीय जैन संघटनेने पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा तीन चारा छावण्या उभ्या केल्या आहेत. ज्या छावण्यांमध्ये ज्यांना जीवदान मिळालेले आहे अशी हजारो जनावरे आनंदाने त्यांच्या गळ्यातील घंटा वाजवत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील कामटवाडी चारा छावणीस जेव्हा भेट दिली, तेव्हा त्या छावणीत 500 हून अधिक जनावरे होती. कुठेही गडबड नाही, घाई नाही. व्यवस्थित चारा मिळतोय, पाणी मिळतेय.
दुष्काळाचं भीषण संकट, हंडाभर पाण्यासाठी पायपीट, चारा नसल्याने जनावरे विकण्याची वेळ, फळबागा करपल्या, काँग्रेसची बैठक

भारतीय जैन संघटनेने या ठिकाणी अत्यंत सुरेख असे नियोजन करत अत्यंत सहजतेने कोणताही श्रेयवाद न करता या जनावरांना व्यवस्थितरित्या जगता यावं अशा स्वरूपाची रचना केली आहे. ग्रामपंचायतीने देखील पुढाकार घेत या ठिकाणी पाण्याची सोय केली आहे. भारतीय जैन संघटनेमार्फत या ठिकाणी जनावरांना पुरेसा चारा दिला जातो.
शेतकरी वाऱ्यावर आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे विदेशात, सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

जणू एक जनावरांचे गाव या ठिकाणी उभे राहिलेले दिसतं. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी गर्दी असते. येथील गावकरी भारतीय जैन संघटनेचे मनापासून आभार मानतात. जर ही चारा छावणी सुरू झाली नसती, तर जनावरे तर कवडीमोल किमतीने विकली गेली असतील, पण काही जनावरे जग सुद्धा सोडून गेले असतील अशा स्वरूपाची भीती हे शेतकरी व्यक्त करतात. परिसरातील बारा वाड्या, वाल्हे, कामठी जेऊर, मांडकी या गावातील जनावरे या चारा छावणीत आहेत. चारा छावणी झाली म्हणून जेष्ठ मंडळी अगदी हात जोडतात.

यावरूनच इथे जनावरांची काय अवस्था होती, त्याची साक्ष पटते. पाऊस पडेपर्यंत ही चारा छावणी सुरू राहणार आहे. या छावणीमध्ये लहान मुलं देखील आपल्या जनावरांची काळजी घेण्यासाठी येत आहेत. अशातच उर्मिला भुजबळ नावाच्या सातवीतील मुलीची भेट झाली. तिच्या गोठ्यामध्ये 11 गायी आणि म्हशी आहेत. त्या सगळ्या गायी आणि म्हशी सध्या चारा छावणीत आहेत. वडील, थोरली बहीण आणि उर्मिला हे सारेच कुटुंब या चारा छावणीमध्ये दिवसभर थांबलेले असते.