अल्पवयीन आरोपीच्या आईला न्यायमूर्ती बाल सुधार गृहात नेण्यात आले आहे. जेजे बोर्डाने पुणे पोलिसांना अल्पवयीन आरोपीची २ तास चौकशी करण्याची परवानगी दिली होती. पुणे क्राईम ब्रँच अल्पवयीन आरोपीची त्याच्या आईच्या उपस्थितीतच चौकशी करणार असल्याची माहिती आहे. ब्लड स्वॅप प्रकरणी दोघांची चौकशी होणार आहे. या दोघांना एकमेकांच्या समोर बसवून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि घटकांबळे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यापूर्वी, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनी डॉक्टर अजय तावरे यांच्याशी व्हॉट्सॲप आणि फेसटाइम कॉल तसेच सामान्य कॉलद्वारे बोलले होते. दोघांमध्ये एकूण १४ कॉल्स झाले होते. हे कॉल १९ मे रोजी सकाळी साडे आठ ते १०.४० च्या दरम्यान करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणासाठी घेण्यात आले होते.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात पहिल्या रक्ताच्या नमुन्यात त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले नाही. शंका आल्यावर पोलिसांनी पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले. येथील डीएनए चाचणीत ससूनमधील रक्ताचे नमुने हे अल्पवयीन आरोपीचे नसून दुसऱ्या व्यक्तीचे असल्याचं समोर आले. त्यानंतर ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्यात आली. मग ते रक्ताचे नमुने हे अजून कोणाचे नसून त्याच्याच आईचे असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत शिवानी अगरवालला अटक करण्यात आली.