‘सरडा रंग बदलतो, पण अशी नवीन जात…’, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले

महाराष्ट्रात सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात सलोखा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक होत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चांगल्या गोष्टी ठाकरे यांची शिवसेना बोलू लागली आहे. त्यावरुन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते, मुख्यमंत्री देवेंद्रजींना यांना फडतूस म्हणत होते, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना झिडकारल, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मतदारांनी त्यांचा कचरा केला. ‘तुम लढो हम कपडे सांभालते’ हे तसे ‘तुम लढो हम बुके देके आते’ असे करत आहेत.

शिवसेनेतील इनकमिंगवर म्हणाले…

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून अनेक पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहे. विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार त्यामुळे मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बुकींग केले होते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या अडीच वर्षांच्या कामावर विश्वास ठेऊन त्यांच्या सर्व फाईव्ह स्टार हॉटेल्सची बुकीग रद्द करुन टाकली, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला लगावला.

विधानसभा तो अभी झाकी हे, महापालिका अभी बाकी हे, ये तो ट्रेलर हे, पिच्चर अभी बाकी है, असे म्हणत एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची, हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली, स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब आणि हिंदुत्वाचे विचार सोडले त्या त्या लोकांना लोकांनी विधानसभेत धडा शिकवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने मोठे यश महायुतीला मिळेल आणि म्हणून म्हणून मोठ्या विश्वासाने लोक आमच्याकडे येत आहे. ते आधी म्हणते होते आमच्याकडे एकही पदाधिकारी राहणार नाही आणि जे गेले ते कचरा आहेत, आता उद्या महाराष्ट्रातून ओघ आमच्याडे येतोय त्याला देखील कचराच बोलतील, परंतु त्यांना आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

आम्ही जे बोललो ते करुन दाखवले

एकनाथ शिंदे म्हणाले की, संस्कृती, संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने शिकवले आहेत. शिव्या, शापांशिवाय ते काही बोलत नव्हते. पहिला सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरे त्यांनी काहीच केलेले नाही. आम्ही आरोपांना आरोपांनी उत्तर दिले नाही. आम्ही कामातून उत्तर दिले आहे.

आता तर 232 आमदार आलेत ना महायुतीचे, मी तर सांगितले होत 200 प्लस जागा आमच्या येतील. ते खरे ठरले, असे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार हे परिपकव नेते आहेत. अभ्यासू नेते आहेत. ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जे म्हटलेल आहे इतर लोकांनी मान्य केले पाहिजे. शिव्या,शाप देणाऱ्यांनी पण ते शिकून घेतले पाहिजे, ते आत्मसात केले पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)