राजस्थान आणि कर्नाटकमध्ये २०१९ च्या तुलनेत भाजपच्या काही जागा कमी असू शकतात. कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी २५, तर महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विशेषतः महाराष्ट्रात काही जागांवर मित्रपक्षांचे जास्त नुकसान होऊ शकते असा भाजपचा फीडबॅक आहे.
भाजपला २०१९ च्या तुलनेत ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. याच राज्यांमध्ये लोकसभेच्या २४४ जागा आहेत व गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी यापैकी ९४ जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या, शनिवारी आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीचा समावेश आहे.
२०१९ मध्ये या ५७ जागांपैकी भाजपप्रणित ‘एनडीए’ने ३२, तर तत्कालीन ‘यूपीए’ने केवळ नऊ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागांवर अन्य पक्षांनी विजय मिळवला होता. ‘एनडीए’ व ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांनी यावेळी पूर्ण ताकद लावली आहे. पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येकजण यंदा स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
प्रदीर्घ सात टप्प्यांतील निवडणूक प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान मोदींनी किमान १७२ जाहीर सभा आणि रोड शो केले. अमित शहा यांनी सुमारे २२१ सभा व रोड शो केले. भाजपाध्यक्ष जे, पी, नड्डा यांनी १३४ सभा घेतल्या. विरोधकांत राहुल गांधींनी सर्वाधिक किमान १०७ सभा आणि रोड शो केले. अखिलेश यादव यांनी ६९ सभा व चार रोड शो केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ६२ सभा आणि अनेक रोड शो केले. प्रियांका गांधी यांनी सर्वाधिक सभा, रोड शो आणि माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी १४०हून अधिक रॅली आणि रोड शो केले. १०० बाइट्स/टिकटॉक आणि मुलाखती दिल्या. तसेच पाच वृत्तपत्रांना दीर्घ मुलाखती दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १००हून अधिक रॅली, २०हून अधिक पत्रकार परिषदा आणि ५०हून अधिक मुलाखती दिल्या. त्यांनी गुरुवारच्या अखेरच्या निवडणूक पत्रकार परिषदेतही येत्या ४ जूनच्या संदर्भात ‘इंडिया’च्या विजयाचा ठाम दावा केला.