प्रतिनिधी, पुणे :‘पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळा’च्या (म्हाडा) पुणे विभागातील चार हजार ८७७ सदनिकांसाठी अर्ज करण्यास पुन्हा सहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी गुरुवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘म्हाडा’ने स्पष्ट केले. येत्या २६ जूनला घरांची सोडत निघणार आहे. अडीच ते तीन महिन्यांत अवघ्या तीस हजार जणांनी ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज केले आहेत.‘म्हाडा’च्या वतीने मार्चमध्ये चार हजार ८७७ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तरीही इच्छुकांकडून घरांसाठी नोंदणी सुरू होती. घरांसाठी ऑनलाइनद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. निवडणुकीमुळे अर्ज करूनही अनेकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नव्हती. त्यामुळेच मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘म्हाडां’तर्गत पुणे विभागाने काढलेल्या सोडतीमध्ये चार हजार ८७७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आजपासून तीन दिवस मुंबईच्या वेगाला खीळ; कर्जत, कसारा, पनवेलसह ‘या’ प्रवाशांना अशी गाठता येणार मुंबई
‘म्हाडा’ला निवडणुकांचा फटका ?
सोडत जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यग्र झाली. ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाइलचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. डोमिसाइलचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात महसूल यंत्रणेतील कर्मचारी, अधिकारी निवडणुकांमध्ये व्यग्र असल्याने ही कागदपत्रे उपलब्ध होण्यास आणखी विलंब लागला. त्यामुळे निवडणुकांच्या कामांचा फटका ‘म्हाडा’च्या सोडतीला बसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. परिणामी, या वेळी कमी अर्ज आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.
तीन महिन्यांत दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ३० हजार जणांनी अर्ज केले आहेत. येत्या सहा जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. येत्या २६ जूनला सदनिकांची सोडत होणार आहे.
– अशोक पाटील, मुख्य अधिकारी, ‘म्हाडा’