पोर्शे प्रकरणामुळे चर्चेत आलेला दादांचा आमदार नॉट रिचेबल; सुनील टिंगरे गेले कुणीकडे?

पुणे: ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, प्रशासनातील अधिकारी, बडे व्यावसायिक, लोकप्रतिनिधी यांचे हितसंबंध उजेडात आले. कल्याणी नगरमध्ये १९ मेच्या मध्यरात्री पोर्शे कारनं भरधाव वेगात दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती उघडकीस आली. आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा लेक होता. त्यानंतर आरोपीच्या सुटकेसाठी धावाधाव सुरु झाली.

अल्पवयन आरोपीला पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात नेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुनील टिंगरेंनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारास विशाल अगरवाल यांचा कॉल आला होता. त्यांनी अपघाताबद्दल सांगितलं. त्यामुळे पोलीस ठाणं गाठल्याची माहिती टिंगरेंनी दिली. यानंतर टिंगरे यांच्याकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं. आरोपीला अटक होताच पोलीस स्टेशन गाठण्याचं कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं. अगरवाल कुटुंबासोबत जुने संबंध आहेत. राजकारणात येण्याआधी मी त्यांच्याकडे काम करायचो. पण या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव आणलेला नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.
Pune Car Accident: पोर्शे अपघाताच्या रात्री आमदाराला सव्वा तासात ४५ मिस्ड कॉल्स; दादांची राष्ट्रवादी गोत्यात
न्यूज१८ नं दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीचे आमदार असलेले सुनील टिंगरे सध्या पक्षाच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात नाहीत. टिंगरे कुठे आहेत याची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला नाही. टिंगरे यांनी पक्षाच्या नेतृत्त्वाशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क साधलेला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. टिंगरे २०१४ मध्ये वडगाव शेरीतून विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला होता.

पोर्शे कारचा अपघात झाला त्या रात्री २.३० ते ३.४५ च्या दरम्यान विशाल अगरवाल यांनी सुनील टिंगरेंना तब्बल ४५ कॉल केले. त्यावेळी टिंगरे झोपलेले होते. त्यांनी अगरवाल यांचा एकही कॉल घेतला नाही. त्यामळे विशाल अगरवाल टिंगरेंच्या घरी पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले. सकाळी ६ वाजेपर्यंत ते पोलीस ठाण्यातच होते. आरोपीच्या सुटकेसाठी राजकीय वजन वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण हा आरोप टिंगरेंनी फेटाळला आहे.