शहराबरोबरच ग्रामीण भागातही डाक निर्यात केंद्रांचे जाळे असल्याने तेथील अनेक उद्योजक, कुशल कारागिरांना त्यांची उत्पादने परदेशात पाठविणे शक्य झाले आहे. या टपाल केंद्रांमध्ये तीस किलोपर्यंत वजन असलेली उत्पादने आंतराष्ट्रीय स्पीड पोस्ट, एअर पार्सल या माध्यमातून पाठविता येतात. गेल्या आर्थिक वर्षात ग्राहकांनी डाक निर्यात केंद्रातून सुमारे ९९७ पार्सल पाठवली असून, त्यातून टपाल विभागाला ४२ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने व्यावसायिकांना, नागरिकांना घर बसल्या वेबसाइटवरून पार्सलच्या प्रवासाची माहिती मिळते, अशी माहिती जायभाये यांनी दिली.
पुण्यात ११८ केंद्रे
‘पुण्यातून सध्या ९८ देशांना स्पीड पोस्ट पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय कुरिअर आणि कागदपत्र टपाल स्वीकारणारी ११८ केंद्रे आहेत. एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या केंद्रांतून सेवांमधून नऊ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. टपाल सेवेबरोबरच कुरिअरची मागणी वाढली आहे. राज्यस्तरीय पार्सलला वर्षभर गर्दी असतेच, अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येणाऱ्या पार्सलमध्येही उल्लेखनीय वाढ झाली आहे.
दिवाळीमध्ये पार्सल सेवेला सर्वाधिक प्रतिसाद असतो. फराळ, खाद्यपदार्थांसह, घरगुती वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या कुरिअर सेवेतून पाठविण्यात येते. टपाल विभागाने पार्सलच्या पॅकेजिंगची उत्तम सेवाही सुरू केल्याने ग्राहक त्यांचे साहित्य पिशवितून घेऊन टपाल कार्यालयात येतात आणि कर्मचाऱ्यांकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकिंग करून घेतात. लवकरच पुण्यातील टपाल निर्यात केंद्रे वाढविण्याचा आमचा विचार आहे,’ अशी माहिती रामचंद्र जायभाये यांनी दिली.
टपाल विभागाला मिळालेले उत्पन्न
टपाल प्रकार २०२२-२३ २०२३-२४
स्पीड पोस्ट कागदपत्र ~ २२ कोटी २० लाख ~ २६ कोटी ५५ लाख
स्पीड पोस्ट पार्सल ~ चार कोटी ९२ लाख ~ सहा कोटी ९६ लाख
व्यवसाय उद्योगाशी निगडित पार्सल ~ दोन कोटी ४ लाख ~ चार कोटी ९२ लाख
आंतरराष्ट्रीय टपाल ~ आठ कोटी ६६ लाख ~ १० कोटी ४ लाख