अपघात प्रकरणातील अल्पवयीन कार चालकाच्या रक्ताचा नमुना ससून रुग्णालयात देण्यापूर्वी डॉ. अजय तावरेसोबत सल्लामसलत करणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष रक्ताचा नमुना देताना उपस्थित असलेल्या तीन व्यक्तींचा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात गुन्हे शाखेने रक्त बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयातील सर्व ‘सीसीटीव्ही’चे फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्या फुटेजमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत.
बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि डॉ. तावरे यांचा घटनेच्या दिवशी दोन तासांच्या काळात सुमारे १४ वेळा संपर्क झाल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळेमार्फत अगरवाल आणि तावरेचा संवाद झाला होता. त्यात आणखी सखोल तपास केल्यानंतर घटकांबळे यालादेखील कारमधून ससून रुग्णालयात आलेली एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने संपूर्ण विषय घटकांबळेला सांगितला. त्या वेळी घटकांबळेने डॉ. तावरेचे नाव सांगून मोबइल क्रमांक दिला. त्यानंतर विशाल व डॉ. तावरेचा संपर्क झाला असल्याचे तपासात समोर आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
त्या तीन व्यक्ती कोण?
अल्पवयीन मुलगा रक्त देण्यासाठी ससून रुग्णालयात आला, तेव्हा एका आलिशान कारमधून आलेल्या तीन व्यक्ती तेथे पोहोचल्या. रक्त नमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्या व्यक्ती कोण, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘दोषींना सोडू नका’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणावर ‘वॉच’ ठेवत आहेत. या प्रकरणाच्या तपासातील दररोजचे ‘अपडेट’ मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत; कोणीही असो, दोषींना सोडू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठळक मुद्दे
– गुन्हे शाखेने डॉ. तावरेच्या ऑफिसचा पंचनामा करून ऑफिस ‘सील’ केले आहे.
– डॉ. तावरेच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये विशेष काही मिळाले नाही.
– पोलिसांनी आता जप्त केलेल्या पुराव्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरुवात केली.