Weather Forecast Maharashtra: शेतकऱ्यांसमोर संकट, महाराष्ट्रातील या भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, आयएमडीचा अंदाज काय?

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच या भागांत पावसाचा इशाराही पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिला आहे.

का होतोय पाऊस?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होत आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस अन् गारपीट होत आहे. राज्यातील जवळपास १२ ते १३ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात पाऊस

जळगाव जिल्ह्यांत सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी, दादर तसेच केळी आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावस झाला. त्यामुळे ज्वारी, दादर ही पिके जमीनदोस्त झाली आहे. अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. हरभऱ्याचे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. रावेर व यावल तालुक्यात केळीच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे देखील त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तूर काढणीवर आली असताना झालेल्या पावसामुळे तुरीचे सुद्धा मोठे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अद्यापही कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही. पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. साधारण वीस मिनिटे पडलेल्या या पावसामुळे तापलेल्या वातावरणाला गारवा मिळाला. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)