‘तेरी मेरी यारी, मार्क मिळाले लई भारी’; दोन जिगरी मैत्रिणींची शंभर नंबरी कामगिरी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकाल सोमवारी, २७ मे रोजी जाहीर झाला. या निकालात पुण्यातील दोन मैत्रिणींनी शंभर नंबरी कामगिरी केली आहे. पुण्यातील महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी महाविद्यायात शिकणाऱ्या प्राजक्ता नाईक आणि सुर्झा घाणेकर या दोन्ही मैत्रिणींना दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. प्राजक्ता आणि सुर्झा या इयत्ता चौथी पासून जिवलग मैत्रिणी आहेत. या परीक्षेत दोघींनीही एकत्र अभ्यास केला आहे. मात्र निकाल लागताच दोघींच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

याबद्दल बोलताना प्राजक्ता आणि सुर्झा म्हणाल्या, ‘ आज निकाल लागत असताना मनात खूप धाकधूक होती. पास होऊ हे निश्चित होत पण टक्के किती पडतील याबाबत खूपच धाकधूक होती. एक वाजता निकाल लागणार असल्याने अर्धा तास आधीच आम्ही निकाल बघत होतो. जेव्हा निकाल लागला आणि पाहिलं की शंभर टक्के मिळाले आहे तर विश्वासच बसत नव्हता. पण आत्ता खूपच आनंद वाटत आहे की जे परिश्रम केलं आहे त्याच चीझ झालं आहे.’
Maharashtra SSC Result 2024 : यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

‘आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास केला असून कुठेही शिकवणी लावली नव्हती. परीक्षेच्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या वर्गात होतो. पण वर्षभर एकत्र अभ्यास केला असून आत्ता आम्हा दोघींना शंभर टक्के मिळाले असल्याने खूपच आनंद होत असल्याचं यावेळी या दोघींनी सांगितले. त्यामुळे या दोन मैत्रिणींचे पुणे शहरातून कौतुक केल जातं आहे.

राज्याचा एकूण निकाल ९५. ८१ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून नऊ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल हा अव्वल लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागातून ९९.०१ टक्के विद्यार्थी तर नागपूरमधील ९४.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के इतका लागला आहे.