भारताची दरवर्षीची तूरडाळ मागणी ४२ लाख टनांच्या घरात असते. या तुलनेत २०२२च्या खरिपात ३६ लाख टन तुरीचे पीक आले होते. त्यानंतर २०२३ च्या खरिप हंगामात हे पीक ३३.३९ लाख टनावर आल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत स्पष्ट होत आहे. तुरीपासून डाळ तयार करताना सरासरी २० टक्के तूर ही वाया जाते. यानुसार आधीच उत्पादन व मागणीत जवळपास १० लाख टनांची तफावत असताना आता तुटीचे संकट आहे. परिणामी दर १८० रुपये प्रतिकिलोकडे जात असल्याचे घाऊक व्यापारी राजन देवारे यांनी सांगितले.
जिऱ्यांच्या दराने गेल्या आठवडाभरात मसाले व धान्य बाजाराचे चित्रच बदलले आहे. घाऊक बाजारात २६० रुपये प्रति किलो असलेले जिरे आता ३८५ रुपये प्रति किलोवर गेले आहेत. किरकोळ बाजारात हा दर ४२० च्या घरात गेला आहे. यामुळे याआधी ६५ ते ७० रुपये प्रति पावकिलो असलेले जिरे आता १०० ते ११० रुपयांवर गेले आहे. याचा परिणाम अन्य सर्वच मसाल्यांवर झाला आहे. आतापर्यंत ५०० ते ५५० रुपये प्रति किलो असलेला गोडा मसाला आता ७०० रुपयांच्या घरात गेला आहे.
‘अनेक आंतरराष्ट्रीय व संघटित सुपर मार्केट साखळी कंपन्यांने जिऱ्यांचा साठा सुरू केल्याने दरवाढ अधिक आहे. मात्र एकूणच धान्य बाजाराला पावसाची प्रतिक्षा असताना खरिपाचा साठा संपत आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने यंदाच्या पावसाळ्यातील पीक बाजारात येईपर्यंत, नवरात्रौत्सवापर्यंत दर कमी होण्याची शक्यता कमी असेल’, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राज्य सरचिटणीस शकंर ठक्कर यांचे म्हणणे आहे.
रब्बीतील हरभरा उत्पादनात घट
भारतात हरभऱ्याचे पीक हे रब्बी (डिसेंबर ते मार्च) हंगामात घेतले जाते. त्याची डाळ एप्रिलनंतर बाजारात येते. राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र, ही तीन राज्ये या पिकात अग्रणी आहेत. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी या पीकात घट झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आर्थिक व सांख्यिकी विभागाच्या आकड्यांनुसार, २०२२ च्या रब्बी हंगामात देशात १३५.४४ लाख टन हरभरा पीकवला गेला होता. मात्र २०२३ मध्ये हे पीक १२२.६७ लाख टनावर आले. आता यावर्षी ते १२१.६१ लाख टनावर आले आहे.