ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीव आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी लाच घेतल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. अल्पवयीन मुलगा हा मद्यप्राशन करुन गाडी चालवत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना ससूनच्या डॉक्टरांनी घेतला आणि मग तो कचऱ्यात टाकला. त्याजागी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठवला होता.
पोलिसांनी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, अपघाती वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील शवागारात काम करणारा अतुल घटकांबळे यांच्याशी संबंधित परिसराची झडती घेतली. यादरम्यान डॉ. हळनोरकडून अडीच लाख रुपये आणि घटकांबळेकडून ५० हजार रुपये जप्त केले आहेत.
हळनोर आणि घटकांबळे यांच्याकडून वसूल केलेली रक्कम त्यांना मिळालेला कट असल्याचं समजते. परंतु तपासाचे मुख्य केंद्र आता डॉ. तावरेचे आर्थिक व्यवहार आहेत, त्यांना किती पैसे मिळाले किंवा आश्वासन दिले गेले आणि कोणाकडून दिले गेले, याचा तपास सुरु आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
तसेच, ब्लड रिपोर्टमध्ये दारु प्यायल्याचं कळू नये म्हणून रक्ताचा नमुना बदलण्याचा सल्ला हा डॉ. अजय तावरे यांनीच दिला होता, असंही तपासात समोर आलं आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी डॉ. अजय तावरे यांच्या पुणे कॅम्प परिसरातील घराटी झडती घेतली.
पोर्शे अपघातानंतर अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आले. कॉल डिटेल रेकॉर्डच्या विश्लेषणावरून असे दिसून आले की त्यापूर्वीच्या दोन तासांत डॉ. तावरे आणि विशाल अगरवालमध्ये तब्बल १४ कॉल झाल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालने व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि स्टँडर्ड सेल्युलर कनेक्शनवर हे कॉल केले गेले होते.
या कॉल्सची माहिती तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणामध्ये प्राप्त झाला आहे. तावरे यांच्याशी विशाल अगरवालचा संपर्क कसा झाला आणि त्यांच्यात मध्यस्थी करणारे दुसरे कोणी होते का, याचाही तपास पोलिस करत आहोत, अशीही माहिती आहे.