कारचा वेग ताशी १६० किमी
गेल्या आठवड्यात शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ‘प्रादेशिक परिवहन विभागा’च्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, अपघातग्रस्त कार ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी पाहणी करून ‘सीसीटीव्ही’ फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कार एका ठिकाणी सुसाट जात असल्याचे दिसून येते. संबंधित रस्त्यावर ‘सीसीटीव्हीं’चे जाळे असूनही अपघाताचा प्रत्यक्ष व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही.
केंद्रीय संस्थांची घेणार मदत
दुचाकीला धडक दिल्यानंतर आलिशान कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य कारवर आदळली. त्या वेळी कारचा वेग किती असेल याचा अभ्यास केंद्रीय संस्थांच्या मदतीने केला जाणार आहे. आलिशान कारच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यात अपघाताच्या ठिकाणची चित्रित झालेली दृश्ये मिळविण्यात येत आहेत. त्यासाठी ‘पोर्शे’च्या तंत्रज्ञांसह आरटीओ अधिकाऱ्यांनी सोमवारी (२७ मे) पुन्हा एकदा तपासणी केली. या सर्व माहितीच्या आधारे ‘एआय’द्वारे अपघाताचे दृश्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘सीसीटीव्हीं’च्या तपासणीवर भर
पोलिसांकडून या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यामध्ये अल्पवयीन कारचालक घरातून निघाल्यापासून अपघाताच्या ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या सर्व घटनांची साखळी जोडण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
‘लवकरच आरोपपत्र होणार दाखल’
गुन्ह्यातील सुरुवातीच्या काही घडामोडींमुळे पोलिसांसह सर्वच यंत्रणांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी गांभीर्य दाखवून कारवाई केली. त्यानंतर, आता गुन्ह्याचा तपास पूर्ण करून लवकरात लवकर सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा मानस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अपघात प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी अपघाताच्या घटनेचे ‘डिजिटल रिक्रिएशन’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रातील संस्थांची मदत घेतली जाणार आहे – शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा