मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, लावला कट्टर विरोधकाचा फोटो

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामळे अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. यावेळी छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही, त्यामुळे भुजबळ हे चांगलेच नाराज झाले, त्यांनी आपली नाराजी उघडपणे अनेकदा बोलून देखील दाखवली.

अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे देखील होते. अजित पवार यांच्यासोबत तेव्हा ज्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये भुजबळांचा देखील समावेश होता. मात्र त्यांना यावेळी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाहीये, भुजबळ नाराज असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे खाते वाटपानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब आहे. तर त्यांच्याऐवजी भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक असे ओळख असलेल्या सुहास कांदे यांचा फोटो लावण्यात आला आहे, त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचं समोर येत आहे. यावेळी त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाहीये.  यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांना मी मंत्रिमंडळात पाहिजे होतो, मात्र मला कोणी डावललं त्याचा शोध घ्यावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)