अजित पवारांनी संघ मुख्यालयात जाणं टाळलं
नागपूर येथील रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. आज महायुतीच्या आमदारांनी येथे हजेरी लावली. संघाने त्यांना आमंत्रण दिले होते. भाजप सह मित्र पक्षातील आमदारांनाही रेशीमबागेतील आरएसएस च्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे अनुपस्थितीत राहिले. रेशीमबागेत संघाचे बौद्धिक झाले. त्यात महायुतीचे आमदार उपस्थित होते. पण अजितदादा गटाने या कार्यक्रमाला दांडी मारली. पण दादा गटातील हा आमदार मात्र उपस्थित होता.
अजितदादांनी स्मृती मंदिरात जाणं टाळलं
महायुतीचा घटकपक्ष असलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बौध्दिकला जाणार का? अशी एकच चर्चा होती. गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशन दरम्यान अजित पवारांचे आमदार आणि खुद्द अजित पवार स्मृती मंदिरात गेले नव्हते. यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम दरम्यान अजित पवारांनी नागपुरात येऊन रेशीम बागेतील आरएसएसच्या स्मृती मंदिरात जाणं टाळलं होतं.
मात्र यावर्षी निवडणुकीत अजित पवारांच्या यशात संघाचेही योगदान असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अजित पवार संघात जाणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आज सकाळी 8 वाजता भाजपचे आमदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्मृती मंदिरात पोहचले. आरएसएस संस्थापक डॉ हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहली.
आम्ही संघाच्या मुख्यालयात जाणार नाही असं काल अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यामुळे आज अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अजितदादांनी या बौद्धिकाकडे पाठ फिरवली. पुरोगामी भूमिकेवर ते ठाम असल्याचे दिसून आले. हिवाळी अधिवेशनादरम्यान या बौद्धिकाला उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. असे असले तरी दादा गटातील तुमसर येथील आमदार राजू कोरमोरे हे उपस्थित असल्याचे समजते.
राष्ट्रसेवेत संघाचे मोठे योगदान
दरम्यान अजितदादांनी वैचारिक अंतर दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत दर्शवली. रेशीम बागेत याआधी सुद्दा आल्याचे त्यांनी सांगीतले. संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली आहे. संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही. मुख्यमंत्री देखील संघाचे सदस्य आहे. राष्ट्रसेवेत संघाचे योगदान नाकारता येत नाही. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच असल्याचे शिंदे म्हणाले.