श्रीवल्लीचा बछडा सुदृढ
गेल्या वर्षी श्रीवल्लीला पुरेसे दूध नसल्याने तिचे तीन बछडे दगावले होते. श्रीवल्लीच्या चार बछड्यांपैकी एक बछडा मानवी प्रयत्नांमुळे बचावला. हा बछडा आता सुदृढ असून त्याला सध्या सफारीमध्ये सोडण्यात येत नसले तरी मोठ्या पिंजऱ्यामध्ये फिरण्यासाठी सोडले जाते.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून ‘टी-२४ सी २’ या वाघिणीला मुंबईत आणले होते. या वाघिणीचे वय साडेचार वर्षे आहे. १७ मे रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १ या वेळेत या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यातील एक बछडा १८ मे रोजी वाघिणीच्या अंगाखाली आल्याने मरण पावला. मात्र इतर तीन बछडे सुस्थितीत आणि निरोगी असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या तीनही बछड्यांचे अंदाजे वजन दोन किलो आहे. या उरलेल्या तिघांचीही आईकडून काळजी घेण्यात येत असल्याने मानवी स्पर्शाची सध्या गरज नसल्याचेही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या बछड्यांचे संगोपन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सिंहविहारचे अधीक्षक निकेत शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
आई-पिल्लांची योग्य काळजी
-या बछड्यांची सध्या डोळे उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिघांचीही अर्धा ते पाऊण तासांच्या अंतराने दूध पिणे आणि झोपणे अशी दैनंदिन प्रक्रिया सुरू असून एखादा बछडा अधिक वेळ झोपला तर वाघीण त्याला मुद्दाम उठवून दूध पाजत आहे. या वाघिणीला दूधही चांगले येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. वाघिणीला म्हशीचे मांस तसेच चिकन खायला देण्यात येत आहे.
-ही वाघीण गर्भार असताना तिची अधिक काळजी घेण्यात आली होती. बंदिस्त वातावरणात इतर कोणताही ताण जाणवू नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. जन्मानंतर वाघिणीनेही तिच्या बछड्यांना सहज स्वीकारलेले असल्याने त्यामध्ये मानवी प्रयत्नांची गरज सध्या तरी नसल्याचे दिसत आहे.
-बंदिस्त परिस्थितीत बछड्यांचा जन्म वाघिणीसाठी सुकर व्हावा यासाठी ‘टी-२४-सी २’ वाघिणीची अधिक काळजी घेण्यात आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. त्यासाठी शतावरीसारखी औषधेही सुरू करण्यात आली. ही वाघीण बछड्यांची काळजी घेत असून त्यावर सीसीटीव्हीने देखरेख ठेवण्यात आली आहे. या वाघिणीच्या वागण्याची कर्मचारी सातत्याने नोंदही ठेवत आहेत.