घरातून निघताच बेपत्ता, ना बॉडी ना पुरावा; कारमध्ये पिरियड ब्लड न् कीर्तीच्या खुनाचं गूढ उकललं

मुंबई: सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सोमवारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवले. ६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणात तपास पथकाला आजपर्यंत कीर्तीचा मृतदेह सापडलेला नाही, तिचे काही अवशेषही सापडले नाहीत. परंतु गुन्हे शाखेकडे अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते, न्यायालयाने ते पुरेसे मानले आणि या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. ही हत्या १६ मार्च २०१८ रोजी झाली होती. आरोपींना मे २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तीन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. २०२१ मध्ये खुशी सजलानीला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला, पण सिद्धेश ताम्हणकर तुरुंगातच होता.

हे प्रकरण शीना बोरा प्रकरणासारखं हायप्रोफाईल प्रकरण होते, त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त के. एम. प्रसन्ना स्वतः त्यावर सतत लक्ष ठेवून होते.

खुशी सजलानीची फोर्ड इकोस्पोर्ट कार मुंबई क्राइम ब्रँचने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली, तेव्हा या प्रकरणातील पहिला पुरावा सापडला. तिच्या कारच्या सीटच्या पुढील आणि मागील बाजूस वाळलेल्या रक्ताच्या खुणा आढळून आल्या. हे रक्त कीर्तीच्या पालकांच्या रक्ताशी मॅच करण्यात आले असता त्यांचा डीएनए मॅच झाला आणि कीर्तीही या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली. यानंतर डीसीपी दिलीप सावंत, वरिष्ठ निरीक्षक राजे, निरीक्षक सचिन माने, हृदय मिश्रा, प्रमोद शिर्के आणि सोनवणे यांच्या पथकाने खुशी सजलानीची कसून चौकशी केली. त्यानंतर सिद्धेश ताम्हणकरचीही चौकशी करण्यात आली. अखेर या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

कोण होती कीर्ती व्यास?

कीर्ती व्यास ही अंधेरी येथील बी ब्लंट कंपनीत वरिष्ठ पदावर होती. या कंपनीत एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पार्टनर आहे. खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकरही याच कंपनीत कामाला होते. या दोघांमध्ये अफेअर सुरू होते. त्यामुळे सिद्धेशच्या कामावर त्याचा परिणाम झाला होता. त्या काळात जीएसटी नव्याने लागू झाला होता. सिद्धेशला याबाबत फारशी माहिती नव्हती आणि तो शिकण्याचा प्रयत्नही करत नव्हता. यामुळे कीर्तीने सिद्धेशला नोटीस दिली होती. १६ मार्च, ज्या दिवशी कीर्तीची हत्या झाली, तो नोटीसला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता. सिद्धेशला संबंधित कंपनीत नोकरी करून अजून पाच वर्षे झाली नव्हती. त्यामुळे नोकरी गमावण्याबरोबरच ग्रॅच्युइटी मिळणार नाही, अशी भीतीही त्याला वाटत होती.

त्यामुळे १६ मार्च रोजी सकाळीच खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे कीर्तीच्या घरा डी. बी. मार्ग परिसरात गेले. ती ऑफिससाठी घरून निघताच दोन्ही आरोपींनी तिला काही तरी बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर गाडीत कीर्तीवर सिद्धेशला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. जेव्हा कीर्तीने त्यांचं ऐकण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी कारमध्ये तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कारच्या मागच्या बाजूला खाली टाकला. यानंतर सिद्धेश गाडीतून खाली उतरला, मग तो परळ येथील घरी गेला तिथून तो ऑफिसला गेला. खुशी सजलानीने मृतदेह असलेले वाहन सांताक्रूझ येथील तिच्या इमारतीत नेले. तिथे कार पार्क केल्यानंतर ती अंधेरीतील कार्यालयात गेली. सायंकाळी पाच वाजता दोन्ही आरोपी काही मिनिटांच्या अंतराने कार्यालयातून बाहेर पडले. खुशीने तिच्या इमारतीतून कार काढली आणि नंतर सिद्धेशला घेतलं. मग या दोघांनी चेंबूरजवळील मेहुल गावातील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकून दिला.

पिरियड ब्लड आणि हत्येचं गूढ उकललं

घटनेच्या रात्री कीर्ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बी ब्लंट कंपनीचे सर्व कर्मचारीही पोलीस ठाण्यात गेले. खुशी आणि सिद्धेश सुद्धा, जेणेकरून त्यांच्यावर कोणी शंका येऊ नये. पण, क्राईम ब्रँचने कीर्तीच्या घरापासून तिच्या ऑफिसपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्याचा निर्णय घेतल्यावर दोन्ही आरोपी घाबरले. आपला गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने त्यांनी पोलिसांना सांगितले की, १६ मार्च रोजी सकाळी कीर्ती आमच्यासोबत कारमध्ये होती. परंतु आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सोडले होते. ती ट्रेनने अंधेरी ऑफिसला जाणार होती. पण, मुंबई सेंट्रल रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती दिसत नसल्याने गुन्हे शाखेने खुशीची कार फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली. तेव्हा तिच्या गाडीत पिरियड ब्लड आढळून आलं, त्यावरुन या हत्येचं गूढ उकललं. मात्र, खुशीचा मृतदेह कधीच सापडला नाही.