२०२३ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनील टिंगरे यांना तावरेसाठी शिफारस पत्र दिलं होतं. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अजय तावरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. हे करण्यासाठी अजय तावरे याला एका आमदाराचा फोन आला होता, असेही बोलले जाते.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात, तर त्याचे वडील आणि आजोबा विविध आरोपांखाली तुरुंगात आहेत. त्यानंतर पब मालक, रक्ताचे नमुने बदलणारे ससून रुग्णालयातील डॉक्टर असे अनेक जण गजाआड झाले आहेत.
दरम्यान, माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत, त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली आहे. वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात. यामध्ये शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार, विनंती बदली आणि इतर अनेक कारणांसाठी शिफारस पत्रे नागरिकांकडून मागितली जातात, असं टिंगरेंनी स्पष्ट केलं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
तसंच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल! असेही टिंगरे म्हणाले.