SSC result 2024: पठ्ठ्याने केली कमाल, सर्व विषयात 35 पेक्षा एक कमी ना एक जास्त

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत 95.81 टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून या विभागातील ९९.०१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ इतका आहे. या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना पुण्यातील एक विद्यार्थी चर्चेत आला आहे.पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश तुपसौंदर याला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले आहेत. प्रथमेशला ५०० पैकी १७५ गुण मिळाले आहेत. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल सायन्स अशा सर्व विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत.


दहावीच्या निकालात एकूण नोंदणी झालेल्या 1560154 पैकी 1549326 इतक्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली त्यापैकी 1484441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के तर मुलांचे प्रमाण ९४.५६ टक्के इतके आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावेळचा निकाल २.५६ टक्के अधिक लागला आहे. गेल्या वेळचा निकाल ९३.२३ टक्के इतका होता. १८ विषयांचा निकाल १०० टक्के असल्याचे बोर्डाने सांगितले. राज्यातील ९ हजार ३८२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावेळी १ लाख ७८ हजार ८६५ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यता आले आहेत.

विभागनिहाय टक्केवारी आणि टक्केवारीनुसार विभागीय मंडळ क्रमांक :
क्रमांक १ : कोकण : ९९.०१ टक्के
क्रमांक २ : कोल्हापूर : ९७.४५ टक्के
क्रमांक ३ : पुणे : ९६.४४ टक्के
क्रमांक ४ : मुंबई : ९५.८३ टक्के
क्रमांक ५ : अमरावती : ९५.५८ टक्के
क्रमांक ६ : नाशिक : ९५.२८ टक्के
क्रमांक ७ : लातूर : ९५.२७ टक्के
क्रमांक ८ : छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
क्रमांक ९ : नागपूर : ९४.७३ टक्के