डॉ.भगवान पवार निलंबन प्रकरणाची दखल विरोधी पक्षांनी घेतली असून आमदार रोहित पवार यांनी, भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांगी मारण्यास सुरुवात केल्याची सडकून टीका समाज माध्यमातून केली आहे. पुणे शहरात ठिकठिकाणी डॉ.भगवान पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. “समस्त पुणेकर डॉ.भगवान पवार यांच्या पाठीशी उभे असून पवार यांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्या”, अशा आशयाचे बॅनर प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी लावले आहेत. या बॅनरबाजीची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
”डॉ.भगवान पवार यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर सरकारमधील खेकड्याच्या प्रवृत्तीचे मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी, नियमबाह्य टेंडरसाठी व बेकायदेशीर कामांसाठी दबाव आणत आहेत. जिथून निघेल तिथून पैसा उकळण्याचा या मुजोर मंत्र्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्या कार्यालयात बोलवून अधिकाऱ्यांना दमदाटी करण्यात येत असेल तर राज्याचा कारभार तालीबानी प्रवृत्तीचे मंत्री चालवत आहेत हे अधोरेखित होत आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यावर खोट्या स्वरूपाचे घाणेरडे व गंभीर आरोप करुन त्रास देणाऱ्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. डॉ.पवार यांना येत्या दोन दिवसात तात्काळ सेवेत रुजू करून न घेतल्यास आरोग्य मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल”, असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी म्हटलं आहे.