अॅड. सत्या मुळे यांच्यामार्फत ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘अल्पवयीन मुलासोबत पार्टीत असलेल्या सर्व मुलांना ताब्यात का घेण्यात आले नाही, त्यांनी जिथे मद्यप्राशन केले, त्या पबमधील काही ग्राहकांचे जबाब, तसेच मारहाण करणाऱ्या नागरिकांचे जबाब पोलिसांनी घेतलेले नाहीत. बारच्या मालकांना अटक झालेली नाही. या बाबी पुरावा म्हणून आवश्यक आहेत, अन्यथा अल्पवयीन मुलाकडून त्या न्यायालयात नाकारल्या जाऊ शकतात. अल्पवयीन मुलाच्या जन्मदाखल्यावरही अविश्वास आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा सकोल तपास आवश्यक असल्याने ही याचिका दाखल केली आहे,’ असे अॅड. मुळे यांनी सांगितले.
‘एक्स्प्रेस वे’पेक्षाही सुसाट
कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील आलिशान कार अपघाताच्या वेळी ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अहवालातून समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांवरील वेगमर्यादा ताशी ४० किमी आहे. ‘एक्स्प्रेस वे’ची वेगमर्यादा ताशी १०० किमी आहे. त्यावरून कल्याणीनगर अपघातातील कार शहराच्या वेगमर्यादेच्या तुलनेत चौपट वेगाने किंवा ‘एक्स्प्रेस वे’वरील वाहनांपेक्षाही सुसाट होती, असे स्पष्ट होते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बारा ‘पब’ना ठोकले टाळे
पुणे शहरातील कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बाणेर; तसेच अन्य भागांतील बॉलर, डिमोरा, युनिकॉर्न, मिलर यांसारख्या पबना टाळे ठोकण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी मध्यरात्री केली. यापुढेही बेकायदेशीर आणि नियमभंग करणाऱ्या पब, बारवर कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.