लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी दूध अत्यंत फायदेशीर आहे. कॅल्शियम वाढवण्यासाठी डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. दूध पिण्याचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे. व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॅटी ऍसिड यासारख्या गोष्टी दुधामध्ये आढळतात. दूध पिल्याने हाडे मजबूत होतात त्यासोबतच अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण देखील होते. यामुळेच दुधाला पूर्ण अन्न असं देखील म्हटले जाते. दुधाचे फायदे दुप्पट करण्यासाठी तुम्ही दुधामध्ये काही गोष्टी मिक्स करू शकता यामुळे हिवाळ्यात त्याचा शरीराला चांगला फायदा होईल.
हळद
हळद ही दाहक विरोधी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट या गुणधर्मांनी समृद्ध आहे. दुधामध्ये हळद टाकून पिल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतोच पण यासोबतच त्वचेला फायदा होतो आणि सांधेदुखी वर हा रामबाण उपाय आहे. हळदीचे दूध पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
सुंठ
हिवाळ्यामध्ये सुंठ हा एक घरगुती प्रभावी उपाय आहे. सर्दी, खोकला, ताप या सामान्य आजारांपासून आराम मिळवून देण्यासाठी सुंठ अत्यंत फायदेशीर आहे. सुंठ टाकून दूध पिल्यास घसा दुखी आणि घशावर सूज आल्यास त्यावर आराम मिळतो. याशिवाय पचनक्रिया ही निरोगी राहते. कोमट दुधात दोन चमचे सुंठ पावडर टाकून पिल्यास सर्दी खोकल्यासारखे सामान्य आजार दूर होतात.
केशर
दुधामध्ये केशर टाकून पिल्याने केवळ दुधाची चवच वाढत नाही तर केशर मुळे शरीराला ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. केशर मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला ते आतून निरोगी ठेवते. केशर टाकून दूध पिल्याने थकवा दूर होतो.
बदाम आणि मनुके
दुधामध्ये मनुके आणि बदाम उकळून पिल्याने हिवाळ्यात शरीर आतून उबदार राहते. यासोबतच शरीराला ऊर्जा देखील मिळते. बदाममध्ये विटामिन ई, प्रोटीन आणि फायबर असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.