Sanjay Raut: गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांचे प्रयत्न, राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई: नागपुरात नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी सामनामधील राखठोक या सदरामध्ये मोदी, शहा आणि फडणवीसांवर हे आरोप केले आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारणात नवा वाद उद्भवला आहे.

तर ४ जूननंतर भाजपात मोदी-शहा यांना पाठिंबा राहणार नाही, असाही दावा त्यांनी केला आहे. नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. जेव्हा गडकरींचा पराभव होणार नाही हे कळालं तेव्हा नाईलाज म्हणून फडणवीस हे प्रचारासाठी उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद ही फडणवीसांनी पुरवल्याचंही ते म्हणाले.

इतकंच नाही तर जर अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही ते घरी पाठवतील, असंही संजय राऊत म्हणाले. योगी को बचाना है, तो मोदी को जाना है, असा प्रचार योगी समर्थकांनी केला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका सहज बसेल, त्यामुळे मोदी शहांना घालवा असं योगी आणि समर्थकांनी ठरवलं आहे. ४ जूनला त्याचा परिणाम दिसेल.

यावरुन आता भाजप नेत्यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे. रोज उठायचं आणि खोटं बोलायचं असं राऊतांचं आहे. त्यांचे आरोप निराधार असून त्यांच्या आरोपात काहीही तत्थ्य नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांवर टीका केली आहे.