8 मित्र फिरायला गेले, खासगी बोटीतून फिरत असताना अचानक… काही सेकंदात होत्याचं नव्हतं, काय झालं त्यांचं?

पुण्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 8 मित्र फिरायला गेलेले असताना दुर्घटना होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पवना डॅममध्ये बोट बुडून झालेल्या या दुर्घटनेमध्ये दोन तरूणांचा जीव गेला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्याच मित्रांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम ने दोघांचे मृतदेह शोधून काढले आहेत. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे अशी मृत तरूणांची नावं असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

अवघ्या काही सेकंदात घात झाला..

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ही दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी आठ मित्र हे पुण्यातील पवना डॅममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी काही मित्र हे तेथील एका खासगी बोटीत बसून धरणातून फेरफटाक मारण्यासाठी गेले होते. मात्र त्याचवेळी घात झाला. फिरायला गेलेल्या तरूणांपैकी एकाची बोट उलटली आणि तो धाडकन पाण्यात कोसळला. तो पाण्यात बुडू लागला. ते पाहून दुसऱ्या बोटीतील त्याच्या मित्राने पाण्यात उडी मारली आणि बुडणाऱ्या तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये ते दोघेही तरूण पाण्यात बुडाले. हा सर्व दुर्दैवी प्रकार तेथील उपस्थितांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. तयांना वाचवण्यासाठी सर्वांनी आरडाओरड केला मात्र काहीच उपयोग झाला नाही.

अखेर या घटनेची माहिती रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी पाण्यात शोध घेऊन एका तरूणाचा मृतदेह त्याच दिवशी बाहेर काढला. मात्र दुसऱ्या तरूणाचा मृतदेह काही त्यादिवशी सापडला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधमोहिम राबवण्यात आली आणि दुसऱ्या तरूणाचाही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे अशी मृतांची नावं असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरूणांचा अकाली जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)