राज्यातील ५६० पेक्षा जास्त बसस्थानकांवर एसटी महामंडळाने ‘नाथजल’साठी १०० चौरस फुटांची मोफत जागा दिली आहे. जागेच्या वापरातून प्रवाशांसाठी एक लिटर आणि अर्धा लिटर बाटलीबंद पाणी विक्री करणे बंधनकारक आहे. सद्य:स्थितीत १०० पेक्षा अधिक स्थानकांवर ‘नाथजल’चे बाटलीबंद पाणी मिळत नसल्याने स्थानिक बाटलीबंद पाण्याची जोरदार विक्री सुरू आहे. त्यात एसटी मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलचाही समावेश आहे.
‘नाथजल’चे एक लिटर पाणी १५ रुपयांना मिळते. अन्य ब्रँडेड बाटलीबंद पाणी २० रुपयांना मिळते. अर्धा लिटर पाण्याची बाटली १० रुपयांना आहे. मात्र, संबंधित कंपनीकडून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मेट्रो शहरे वगळता अन्य स्थानकांत पाणपोईही उपलब्ध नाही. ‘नाथजल’ उपलब्ध असलेल्या स्थानकांवर चढ्या दराने ‘नाथजल’ची विक्री केली जाते. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. यांमुळे स्थानिक विक्रेते व एसटीचे अधिकारी यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे.
महामंडळाच्या उत्पन्नाला फटका
एसटी महामंडळाच्या प्रवाशांना किफायतशीर दरात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून ‘शेळके बेव्हरेजेस’ची नियुक्ती केली. पाणीबाटली पुरवठादार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रत्येक बाटलीमागे एक रुपया मानधन महामंडळास मिळत होते. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत महामंडळाला तीन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ‘नाथजल’च्या अनुपलब्धतेमुळे भरउन्हाळ्यात प्रवाशांच्या त्रासात भर पडली असून, महामंडळाच्या मोक्याच्या जागा फुकटात वापरात असल्याने कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.