अल्पवयीन आरोपीला अपघाताच्या रात्री पोर्शे कारची चावी आणि क्रेडिट कार्ड त्याच्या आजोबांनी दिलं होतं. पोलीस तपासातून ही माहिती उघड झाली आहे. अल्पवयीन नातवाला कारची चावी देण्याचा परिणाम असा होईल याचा विचारच केला नव्हता, असं आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकरणात आरोपीच्या आजोबासह चालकाचीही चौकशी झाली आहे.
प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन मित्रांसोबत बारावी परिक्षेच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी गेला होता. त्यावेळी त्याच्या आजोबांनी त्याला पोर्शे कारची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं. आपल्या या निर्णयाबद्दल खंत वाटत असल्याचं आजोबांनी चौकशीत सांगितलं. अल्पवयीन आरोपीनं वडगाव शेरीतील त्यांच्या बंगल्यापासून कोझी पब आणि ब्लॉक क्लबपर्यंत पोर्शे कार चालवली. त्यावेळी त्याच्यासोबत अगरवाल कुटुंबाचा चालकदेखील होता.
पबमध्ये आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रांनी ४८ हजारांचं बिल केलं. ब्लॉक क्लबमधून बाहेर पडताना आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत दिसत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र तरीही त्यानं पोर्शे कार चालवण्याचा हट्ट धरला. सुरक्षेचा विषय लक्षात घेता चालक गंगारान पुजारीनं पार्किंग लॉटमधून स्वत: कार काढली. मुलाचा कार चालवण्याचा हट्ट त्यानंतरही कायम होता. त्यानं चालकाशी वाद घातला. त्यामुळे पुजारी यांनी मुलाच्या वडिलांना फोन केला. मुलाला कार चालवू दे, तू त्याच्या शेजारी बस असं विशाल अगरवाल यांनी चालकाला सांगितलं. त्यानंतर पुजारी बाजूला बसले. तर मुलाचे मित्र मागच्या सीटवर बसले.