मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार श्रीकांत पाटील हे सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास इंदापूर शहरातील अंतर्गत रस्त्यावरुन आपल्या मोटारीतून जात होते. यावेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच काठीने गाडीवर मारहाण केली. पाटील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यातून तहसीलदार श्रीकांत पाटील बचावले. मात्र या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तहसीलदार पाटील हे मागील दोन दिवसांपासून उजनी पात्रातील बुडालेल्या सहा जणांच्या शोधासाठी इंदापूर तालुक्यातील कळाशी गावात उजनीकाठी ठाण मांडून होते. त्यांनी करमाळा तालुक्यातील नातेवाईकांची वेळोवेळी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तहसीलदार पाटील हे त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे सुपरिचित आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे कारण समजू शकले नाही.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनेचा नोंदविला निषेध
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया हँडलवरून निषेध नोंदविला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे.
गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध. अशी भावना सुळे यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.