राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला आले होते, हे सत्य आहे. मात्र पोलीसांनी कारवाई नियमानुसारच केली. येरवडा पोलिसांकडून तपासात हलगर्जी झाली, त्यांची सध्या चौकशी सुरु आहे, अशी माहितीही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आरोपी गाडी चालवत नव्हता, असे भासवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तपासात तसं काही आढळलं नाही. गाडीत एकूण चौघं जण होतं. अल्पवयीन आरोपीला धरुन तीन मुलं आणि एक ड्रायव्हर असे चार जण होते. त्याआधी झालेल्या पार्टीत ११-१२ जण उपस्थित होते, असेही आयुक्तांनी सांगितले. अल्पवयीन आरोपीसह त्याचे मित्र आणि बापाने तसा जबाबात दावा केल्याचं वृत्त समोर आलं होतं.
दरम्यान, आरोपीने जामीन मिळाल्यानंतर केलेल्या कथित रॅप साँगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र प्राथमिक चौकशीत तो व्हिडिओ त्या मुलांनी तयार केला नसल्याचे दिसते. संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशाराही अमितेश कुमार यांनी दिला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
पोलिसांनी सुरुवातीपासूनच कायद्यानुसार कारवाई केली आहे. पोलिसांवर दबाव होता किंवा तपासात दिरंगाई झाली हे म्हणणे बरोबर नाही. सुरुवातीच्या काळात ३०४ का नाही लावला, आरोपीला सुविधा पुरवण्यात आली यावर चौकशी केली. मात्र, यामध्ये कुठलेही तथ्य दिसून आले नाही. साक्षीदाराशी वाईट वागणूक झाली का याचीही तपासणी सुरु आहे, जर हे खरं ठरलं तर कठोर कारवाई केली जाईल. मी नागरिकांना आश्वासन देतो की यावर कठोरात कठोर कारवाई होईल, असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.