प्रतिनिधी, पुणे : रात्रीच्या वेळेला मित्रासोबत हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार घडला. चोरट्यांनी तरुणीची सोनसाखळी व तीन अंगठ्या असा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मेच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झाली आहे. ती सध्या जनवाडी येथील एका होस्टेलमध्ये राहते. ती मंगळवारी (२१ मे) रात्री मित्रासोबत हनुमान टेकडीवर फिरायला गेली होती. ते दोघे टेकडीवरील मंदिराजवळ बसलेले असताना, दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी तरुणीला व तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्ती काढून घेतल्या आणि चोरट्यांनी तेथून पळ काढला. या प्रकारामुळे तरुणी आणि तिचा मित्र घाबरले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
दरम्यान, हनुमान टेकडीवर सकाळच्या वेळी आसपासच्या परिसरातील नागरिक फिरायला जात असतात, तर महाविद्यालयीन तरुण-तरुणी फिरायला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. सायंकाळनंतरही अनेक जण तेथे फिरायला जातात. निर्जनस्थळी किंवा अंधारात बसणाऱ्या प्रेमीयुगुलासोबत अश्लील वर्तन केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे डेक्कन पोलिसांचे बीट मार्शल दररोज रात्री तेथे गस्त घालत असतात; तसेच रात्रीच्या वेळेला तरुणांनी तेथे बसू नये, असे आवाहनही करतात. मात्र, त्यानंतरही तरुणांकडून बेशिस्तीचे दर्शन घडत आहे. त्यास चाप लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.