महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनं 132 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे. लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नव्हंत, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं तब्बल 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीनंतर आता अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय बनेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा राष्ट्रवादीला मिळून देऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये घोटाळा झाला असं विरोधक म्हणतात असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे.