Mumbai News : दुचाकीवरून फिरा, खड्डेपाहणी करा! मुंबई महापालिकेचे रस्ते विभातातील अभियंत्यांना निर्देश

प्रतिनिधी, मुंबई : पावसाच्या आगमनासोबतच रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला सर्वसामान्यांपासून ते न्यायालयापर्यंतच्या टीकेला सामोरे जावे लागते. हा रोष टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्ते विभागातील सर्व अभियंत्यांना दुचाकीवरून फिरून खड्डेपाहणी करा, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचेही समजते.मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून मेपासूनच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. सप्टेंबरपर्यंत हे काम जोमाने सुरू असते. मात्र, मुंबईकरांना पुन्हा-पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२३मध्ये मुंबई महापालिकेला दिले होते. या निर्देशांनंतर प्रत्येक विभागस्तरावर खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्तांना नेमण्यात आले होते.

Nashik Water Crisis: सातशे कोटींचा खर्च पाण्यात! तात्पुरत्या उपायांमुळे नाशकात दरवर्षी पाणीटंचाईचा आलेख चढताच

यंदा मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता रस्ते अभियंत्यांनीच दुचाकीवरून फिरून खड्ड्यांची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करावेत, असे निर्देश मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही होऊ लागल्याची माहिती बांगर यांनी दिली.

सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच समाजमाध्यमांतून रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेला उपलब्ध होत असते. त्यानुसार उपाययोजनाही केल्या जातात. मात्र, त्याची प्रतीक्षा करण्याऐवजी महापालिकेच्या अभियंत्यांनीच जाऊन पाहणी करून उपाययोजना केल्या, तर खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. चारचाकीमधून फिरून तपासणी करण्याऐवजी दुचाकीवरून फिरून रस्त्यांची स्थिती चटकन लक्षात येईल. त्यामुळे दुचाकीवरून फिरून माहिती घेण्यास सांगितल्याचे बांगर यांनी सांगितले.

सर्वाधिक अपघात दुकाचीस्वारांचे

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचेच होतात. दुचाकी चालवताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक लावणे आणि त्यामुळे दुचाकी उलटणे, मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसणे आदी कारणांनी होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तर काही दुचाकीस्वार गंभीर जखमीही होतात.

दोन वर्षांत एक लाख खड्डे बुजवले

मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची डोकेदुखी कमी झालेली नाही. मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी ७५ हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवले. सन २०२२मध्ये ३८ हजार ३१० खड्डे बुजवण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांत एक लाखापेक्षा अधिक खड्डे बुजवण्यात आले आहेत. यंदा खड्ड्यांची मोजदाद करण्यापेक्षा ते बुजवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

‘काँक्रीटीकरण पावसाळ्यानंतरच’

मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील ३९७ किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी जानेवारी २०२३मध्येच निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचे कंत्राट पाच कंपन्यांना मिळाले आहे. मात्र, मुंबई शहरातील काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवातच न झाल्याने मुंबई महापालिकेने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले होते. फक्त उपनगरांतील कामे सुरू आहेत. आता शहरातील कामासाठी दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून, जून महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू होतील, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.