मुंबईकरांनो आजच कळश्या, भगुनी भरून ठेवा, 2 दिवस या भागात पाणी येणार नाही; तुमचा विभाग यात आहे का ?

मुंबईत या भागात 2 दिवस पाणी नाहीImage Credit source: प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील प्रभादेवी मार्गासह करी रोड तसेच आणखी काही भागांमध्ये दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनी दुरूस्त करण्याच्या कारणामुळे 28 व 29 नोव्हेंबर रोजी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहील. 22 तासांच्या दुरूस्ती कालावधीमध्ये हा पाणीपुरवठा खंडित राहणार असून या कालावधीमध्ये पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे असा आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

लोअर परळ परिसरातील 1,450 मिलीमीटर व्यासाची तानसा या मुख्य जलवाहिनीचे दुरूस्तीचे काम गुरूवार 28 नोव्हेंबर रात्री 10 पासून शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या 22 तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या 1,450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे.

गुरूवार, 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता हे काम सुरू होईल. तर शुक्रवारी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ते पूर्ण होईल. या कालावधीअंतर्गत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत जी दक्षिण व जी उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

कोणत्या विभागात पाणीपुरवठा बंद ?

जी दक्षिण विभाग : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे 4.30 ० ते सकाळी 7.45 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील

जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी 2.30 ते दुपारी 3.30) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी 3.30 ते सायंकाळी 7.00 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – संध्याकाळी7.00 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा अंशत: बंद राहील. (३३ टक्के)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)