तासभर TV पाहतोय, २ तास खेळतोय; पोर्शेनं दोघांना चिरडणारा आरोपी सध्या काय काय करतोय?

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक देण्याचा आरोप असलेल्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या आरोपी मुलानं येरवड्याच्या सरकारी बालसुधारगृहात दिवस घालवला. या ठिकाणी आणखी ३४ मुलं आहेत.

ज्युवेनाईल जस्टिस बोर्डानं आरोपीला जामीन मंजूर केला होता. यानंतर समाजातून प्रचंड रोष व्यक्त झाला. त्यानंतर पोलिसांना जाग आली. त्यांनी जामिनाला विरोध करत बोर्डाकडे जामिनाबद्दल पुनर्विचार करण्याची मागणी केली. यानंतर आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. ५ जूनपर्यंत त्याचा मुक्काम इथेच असेल.
Pune Porsche Accident: पुण्यात अपघात, प्रकरण गाजलं देशभरात; NCPचा आमदार संशयाच्या भोवऱ्यात, पण अजितदादा आहेत कुठे?
बालसुधारगृहात असलेल्या मुलाकडे सध्या मोबाईल किंवा अन्य कोणतंही गॅजेट नाही. बुधवारी रात्री साडे दहा वाजता तो झोपला. गुरुवारी सकाळी ६ वाजता उठून तो दूध प्यायला, त्यानं फळं आणि पोहे खाल्ले. नाश्ता केल्यानंतर तो दीड तास बालसुधारगृहातील अन्य मुलांसोबत फुटबॉल खेळला. दुपारच्या सुमारास त्यानं स्वयंपाकघरात जाऊन तिथल्या आचाऱ्याला मदत केली. पोळी, भाजी आणि वरण भात तयार करण्यात त्यानं आचाऱ्याला सहाय्य केल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. यानंतर आरोपी कॅरम खेळला. कॉमन हॉलमध्ये बाकीच्या मुलांसोबत टीव्ही पाहिला.
Pune Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या कारबद्दल धक्कादायक माहिती उघड; अगरवालच्या सूचनेचाही तपासातून उलगडा
‘आरोपी अन्य मुलांसोबत काही तासांमध्येच मिसळला. बालसुधारगृहातील बाकीची मुलं झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील आहेत. पण त्यांच्याशी संवाद साधताना आरोपीला कोणतीही अडचण येत नाही. संध्याकाळच्या सुमारास आरोपी मैदानी खेळ खेळला. रात्री आठच्या सुमारास त्यानं बाकीच्या मुलांसोबत वरण, भात, पोळी, भाजी खाल्ली,’ अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.

शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगरात भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरुन दोन तरुण अभियंते प्रवास करत होते. धडकेत त्यांचा मृत्यू झाला. कारनं दिलेली धडक इतकी भीषण होती की दोघे काही फूट हवेत उडाले. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ता अशी मृतांची नावं आहेत. दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूरचे रहिवासी होते. दोघे २४ वर्षांचे होते.