रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या किशोरवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या पोर्शे कारने दुचाकीने जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन येथे रविवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात दोघाही जणांचा मृत्यू झाला.
चालकाचा वेगळाचा दावा
दरम्यान, अल्पवयीन आरोपी कोझी पबमधून बाहेर आल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नसल्याचे पाहून कार चालकाने ती गोष्ट त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली होती. त्यावर ‘मुलाला कार चालवू दे’ असे वडिलांनी सांगितले, असा जबाब चालकाने दिल्याचे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या वेळी मुलाच्या वडिलांनी चालकाचे ऐकले असते आणि मुलाला गाडी चालविण्यापासून रोखले असते, तर दोन निष्पापांचे जीव वाचले असते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारचालक मुलाला १४ दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या वडिलांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि त्यांचा चालक गंगाधाम यांना गुरुवारी गुन्हे शाखेने चौकशीसाठी पोलिस आयुक्तालयात बोलावले होते. पोलिसांनी दाखल केलेले दोन्ही गुन्हे म्हणजे घटनांची मालिका असून, ती तपासण्यासाठी गुन्हे शाखेने दोघांचा जबाब घेतला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अल्पवयीन मुलाने घरापासूनच चालवली कार
‘पार्टीला जातानाच अल्पवयीन मुलाने घरातून कार चालवत कोझी पबपर्यंत नेली होती. त्या वेळी अपघाताचा काही प्रकार घडू शकतो, असे वाटले नव्हते,’ असे सुरेंद्र अगरवाल यांनी जबाबात सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यापाठोपाठ चालक दुसरी गाडी घेऊन पबमध्ये गेला होता. पबमधून बाहेर पडताना चालकाने आलिशान कार पार्किंगमधून बाहेर काढली. त्या वेळी मुलाने ती गाडी चालवण्यास मागितली. तेव्हा चालकाने विशाल अगरवाल यांना फोन करून मुलगा गाडी चालवण्याचा आग्रह करत असल्याचे सांगितले. विशाल अगरवाल यांनी परवानगी दिल्याने चालकाने गाडी मुलाच्या ताब्यात दिली आणि स्वत: बाजूच्या सीटीवर बसला, असा जबाब चालकाने दिला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.