मुख्यमंत्री कोण? दिल्लीतही लॉबिंग?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. तर दुसरीकडे राज्याचे नेतृत्व कोण करणार यावरून आता खल सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने या पेचात न पडण्याचे अगोदरच धोरण ठरवले असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा सामना सहजासहजी हातचा जाऊ देऊ इच्छित नसल्याचे पडद्यामागील घाडामोडींवरून समोर येत आहे. मुख्यमंत्री पदासाठी एक फॉर्म्युला असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाने आता दिल्लीत सुद्धा लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीचे पडसाद दिल्लीत सुद्धा उमटताना दिसत आहे.
शिंदे सेनेला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्यानंतर हे दमदार यश मिळाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या यशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागली आहे. तर भाजपला १३० पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं समोपचारानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
वाटाघाटीने वादावर तोडगा
वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.
दिल्ली दरबारी ‘फिल्डिंग’
एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाचे ७ खासदार आणि ४ माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे.