विजयाचे खरे शिल्पकार कोण? देवेंद्र फडणवीस यांनी दिले या लोकांना श्रेय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या निवडणुकीचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला जात आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातील राजकारणाचे नवीन चाणक्य ठरले असल्याचे म्हटले जात आहे. कारण आतापर्यत भाजपला इतक यश कधी मिळाले नव्हते. परंतु २०२४ मध्ये भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. त्यासंदर्भात X वर ट्विट करत त्यांनी मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद यांना श्रेय दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने विश्वास दाखवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले?

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे भावनिक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे.

यशाचे श्रेय यांना दिले

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.

आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केले आहे. अनेकांनी आपल्या कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने देवाभाऊ म्हणत, ही सर्व तुमची मेहनत असल्याचे म्हटले आहे. आणखी एक युजर शपथविधी समारंभाचे निमंत्रण कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)