RSS चा ‘तो’ मास्टरप्लॅन, ज्याने भाजपाचा विजयाचा मार्ग प्रशस्त, बंपर विजायाची इनसाईड स्टोरी एका क्लिकवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का दिला. काहीजण तर अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तर या भव्यदिव्य यशाचे आणि तितक्याच मोठ्या पराभवाचे विश्लेषण सुरू झाले आहे. खरंतर भाजपाच्या या यशाचं गुपित म्हणा अथवा चावी म्हणा ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे होती हे ओपन सीक्रेट आहे. मतमोजणीतील नवीन आकडेवारीनुसार भाजपाच्या नेतृत्वात लढलेल्या महायुतीला 288 जागांपैकी 235 इतक्या विक्रमी जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या आहेत.

विधानसभेला ती चूक टाळली

लोकसभेवेळी भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी आता आम्हाला विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचा कांगावा केला. त्यावरून एकच वादळ उठलं. संघ आणि भाजपातील संबंध ताणल्या गेले. लोकसभा आणि काही राज्यातील निवडणुकीत भाजपाचे हात पोळले. पण विधानसभेला ही चूक भाजपाने टाळली. जे.पी. नड्डा यांचा एक कार्यक्रम वगळता ते या निवडणुकीत फिरून दिसले नाहीत. पुढील सूत्र संघाने हाती घेतल्यानंतर भाजपाला विजयाचा मार्ग सुकर झाला.

छोट्या घटकांची बांधली मोट

सूत्रांनुसार, संघाने त्यांच्या संघटन कौशल्याचा मुख्य वापर केला. छोट्या-छोट्या गटा संघ स्वयंसेवकांनी राज्यातील काना-कोपर्‍यात बैठकांवर जोर दिला. त्या भागातील सामाजिक, राजकीय समस्या जाणून घेतल्या. अनेक कुटुंबाशी थेट संपर्क साधला. या संपर्कात राष्ट्रभान, राष्ट्र हित, हिंदुत्व, सुशासन, विकास, लोक कल्याण आणि एकसंघ समाज तसेच स्थानिक विकासाच्या मुद्दावर लोकांना आश्वस्त करण्यात आले. संघाची विश्वासर्हता यासाठी कामी आली. या बैठकांमध्ये भाजपाला थेट मतदानाचे आवाहन टाळण्यात आले. तर पुरक मुद्यांवर त्या विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचे सूचवण्यात आले, हे विशेष.

मराठा-ओबीसी वाद

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाने राज्यात मोठा संभ्रम तयार झाला. हिंदूमधील दोन गटात गैर समजाचे वातावरण तयार झाले. वैचारिक लढाईला जातीय ध्रुवीकरणाचे वंगण देण्याचा प्रयत्न संघाने हेरला. दोन्ही समाजातील तरुणाईपर्यंत हिंदू विचार, हिंदू हितावर, राष्ट्र हित हा विचार पोहचवला. त्यांनी कोणत्याही समाजाला दुखवले नाही. कोणतेही आश्वासन दिले नाही. पण विचारानेच विचारावर मात केल्याचे निकालातून दिसून आले. हिंदू विचारांवर दोन्ही गट एकत्र आले.

भाजपाचा संघावर भरवसा

आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला ग्राऊंडवर मोठी मदत केली आहे. संघटना राजकारणात नसली तरी त्यांची राजकीय विचारधारा सांभाळणाऱ्या भाजपाला संकटात त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे भाजपाचा संघावर भरवसा आहे. त्याला आतापर्यंत संघाकडून कधीच तडा गेलेला नाही. विधानसभेचे मतदान होताच त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली होती.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)