Maharashtra Election Result 2024 : निकालाच्या दिवशीसंजय राऊत 10.30 वाजता आले आणि बोलले….

“माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, कुछ तो गडबड हैं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा कोणत्या भरवशावर मिळतात?. अजित पवार यांना 40 च्या वर जागा मिळतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी असे काय दिवे लावले? इथे त्यांना 120 पेक्षा जास्त जागा मिळतात” अशी प्रतिक्रिया निकालावर संजय राऊत यांनी दिली आहे. “महाराष्ट्राच वातावरण, कल ज्या पद्धतीने होता, आम्ही ग्राऊंडवर जमिनीवर होतो. निकाल आल्यानंतर लोकशाहीच कौल, प्रथा मानण्याची परंपरा आहे. आम्ही ती पाळलेली आहे. पण हा कौल कसा मानावा असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं. त्यांना तुम्ही 10 जागा द्यायलाही तयार नाही. काहीतरी गडबड आहे, ती कळेल” असं संजय राऊत म्हणाले.

“हा जनतेचा कौल मान्य करायला तयार नाही. जय-पराजय होत असतो, हार-जीत होत असते, त्याविषयी काही म्हणायचं नाहीय. हा लावून घेतलेला निकाल आहे. या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास असू शकत नाही” असं संजय राऊत म्हणाले. या निकालावर लाडकी बहिण योजनेचा प्रभाव आहे का? त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘लाडके भाऊ, लाडके आजोबा, लाडके मामा, लाडके दादा नाहीत का?’

‘निवडणुकीत पैशांचा वापर झाला याबद्दल माझ्या मनात शंका नाही’

“मी परत सांगतो काहीतरी गडबड आहे. मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर गौतम अदानींच लक्ष होतं. या निवडणुकीत पैशांचा वापर झाला. या निकालांवर अदानींचा प्रभाव आहे. गौतम अदानी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वेगळे नाहीत. निवडणुकीत पैशांचा वापर झाला याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे निवडून येऊ शकतात. अजित पवार यांच्या गद्दारीवरुन महाराष्ट्रात रोष होता. आमच्या महाविकास आघाडीला 75 जागाही मिळत नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांनी ठरवून हा निकाल लावला” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)