राज्यातच नाही मराठवाड्यामधील निवडणुकीचा कौल पाहता, महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसले. आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आली ती महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येते. लाडकी बहीण, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदू एकवटल्याचे दिसते. राज्यातच नाही तर मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर गणित जुळवता आले. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. पण सध्याचा ट्रेंड हा महाविकास आघाडीच्या विरोधात असल्याचे दिसून आले.
महायुतीसह भाजपाची आघाडी
या कलामध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. आता आलेल्या आकडेवारीनुसार 128 जागांवर भाजपा आघाडीवर दिसत आहे. तर 58 जागांवर शिंदे सेना पुढे आहे. मराठवाड्यात सुद्धा महाविकास आघाडीचे विजयाचे नगारे वाजत आहेत. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 35 जागांवर महायुतीने मोठी बाजी मारल्याचे दिसते. तर महाविकास आघाडीला केवळ 10 जागांवर आघाडी असल्याचे समोर येत आहे. विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर महायुती तर 15 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.
आता मराठा आरक्षणाचं काय होणार?
यापूर्वी मराठा आरक्षणाचा विषयाने राज्यात आक्रमक दिसला. लोकसभेत अनेक ठिकाणी महायुतीचे पानिपत झाले होते. त्यानंतर भाजपा, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांची टीका सुरू होती. एकवेळ तर त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली होती. पण वेळेवर त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे मला सांगता येणार नाही, असे वक्तव्य केले. निवडून येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये असे ते म्हणाले होते.
उपोषणासाठी तयार राहा
आता पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी काल केले. सरकार स्थापन झाले की आपण उपोषणाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले. गावात कुठेही आमरण उपोषण करायचे नाही. तर अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करायचे असे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी ज्यांना मतदान केले, त्यांनी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर महायुतीमधील नेत्यांनी सरकार आले तर त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असे वक्तव्य केले होते. एकंदरीत कल पाहता जरांगे फॅक्टर चालला नाही असेच चित्र दिसत आहे.