Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला २२८ जागांवर आघाडी मिळत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला पन्नासी गाठता येत नाही. त्यानंतर विरोधकांकडून पुन्हा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी बॉलीवूड कलाकार स्वरा भास्कार यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.
स्वरा भास्करचे पती फहाद अहमद अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने त्यांना तिकीट दिले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आणि नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना तिकीट दिले होते. निकालात पतीच्या पराभवानंतर स्वराने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आणि निवडणूक आयोगाकडे उत्तरे मागितली.
काय म्हटले स्वरा भास्करने
स्वरा भास्करने ट्विट करून म्हटले आहे की, मतदानाचा पूर्ण दिवस ईव्हीएम मशीन 99% चार्ज कसे होऊ शकते? निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर द्यावे. अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मते मिळू लागली, शेवटी असे कसे?
महायुतीला मिळालेल्या या विजयाबद्दल संजय राऊत यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केला. हा निकाल मान्य नाही. पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, असे राऊत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील जनता पाठिशी होती. आता कसा पराभव झाला. नक्कीच ईव्हीएममध्ये गोंधळ आहे, असे म्हटले आहे.
अणुशक्ती नगरमधून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे फहाद अहमद यांचा सना मलिक यांनी पराभव केला. सना मलिक यांना या ठिकाणी 49341 मते मिळाली. फहद यांना 45963 मते मिळाली. मनसे उमेदवार आचार्य नवीन विद्यादर 28362 मते घेऊन तिसरा क्रमांक मिळवला. 3378 मतांनी फहाद अहमद यांचा पराभव झाला.