उत्तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा पूर्ण सफाया, भाजपचे यश असे की…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पूर्ण सफाया झाला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला एकाही जागा मिळवता आली नाही. या भागांत उद्धव ठाकरे यांनी अनेक मतदार संघात सभा घेतल्या. गद्दारीचा मुद्दा मांडला. बंडखोरांना पाडण्याचे आव्हान केले. परंतु उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे महायुतीने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला. त्यात भाजपला वीस, राष्ट्रवादीला १० आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा जागा मिळाल्या. काँग्रेसला तीन तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.

उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मंत्री निवडणूक रिंगणात होते. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, छगन भुजबळ यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. परंतु उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे महायुतीच्या पाठिशी राहिला. एकाही विद्यामान मंत्र्यांचा पराभव झाला नाही. सर्वांनी आपल्या मतदार संघात विजय मिळवला. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे उत्तर महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्याचे आव्हान आहे. या भागात उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक दौरे केले. मेळावे घेतले. सभाही घेतल्या. परंतु लोकसभेप्रमाणे कामगिरी शिवसेना उबाठाला करता आली नाही.

निकालावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एखादा सोडल्यास सगळ्यात एक्झिट पोल मध्ये महायुतीला क्लिअर मेजॉरिटी दाखवली. एखाद्या सर्व्हेने महाविकास आघाडीची सत्ता दाखवली. आज सुद्धा एक रिपोर्ट आला. त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती खूप मोठ्या प्रमाणात निवडून येईल.

गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांना सांगा. ते आम्हाला गद्दार म्हणत होते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या पाचच्या पाच जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. या खुद्दारांनी आणि सगळ्या जागा जिंकलेल्या आहेत. आतापर्यंतच्या पाच निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने मी यावेळी निवडून आलो आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. जनतेने खऱ्या शिवसेनेलाच कौल दिलेला आहे. त्यामुळे खरे शिवसेना आमचीच असल्याचं स्पष्ट झाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)