दोघांचा जीव घेणाऱ्या कारबद्दल धक्कादायक माहिती उघड; अग्रवालच्या सुचनेचाही तपासातून उलगडा

पुणे: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्यात दोन तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कार चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. अपघातापूर्वी तो त्याच्या मित्रांसह पबमध्ये गेला होता. तिथे त्यानं मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मुलानं कार चालवायला मागितली तर त्याला कार चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालनं दिली होती. अग्रवालच्या कार चालकानंच पोलीस चौकशीत ही माहिती दिली आहे. अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. मात्र तरीही अग्रवालनं ती कार मुलाच्या ताब्यात दिल्याचं उघडकीस आलं आहे.
Pune Porsche Accident: अपघातापूर्वीचा दीड तास, ४८ हजार अन् २ पब; पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
कल्याणीनगर अपघात प्रकरणी अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारचालक अल्पवयीन मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य उपलब्ध करुन देणं तसंच त्याला कार दिल्याप्रकरणी मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक झाली आहे. मुलानं जिथे मद्य प्राशन केलं, त्या पबमधील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, तिथे मद्य मिळतं, याची माहिती अग्रवालला होती. पण तरीही त्यानं मुलाला पार्टी जाण्यासाठी परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे दिले होते का? किती पैसे दिले होते? क्रेडिट कार्ड दिलं होतं का? पार्टी करण्यासाठी आणखी कोण होतं? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकार वकिलांकडून करण्यात आला. पण न्यायालयानं त्यांना २४ मेपर्यंतची कोठडी सुनावली.