Baramati Result : अजित पवारांनी बदला घेतला, बारामतीत मोठा उलटफेर, महाराष्ट्राचा निकाल काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत मोठा उलटफेर झालेला बघायला मिळतोय. एक्झिट पोलच्या आकडेवारीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरकार स्थापनेत काँटे की टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण महायुतीने सर्व अंदाजांना फोल ठरवत निवडणुकीत क्लीप स्वीप मिळवली आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. बारामतीत काय होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर बारामतीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. अजित पवार विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करत आहेत.

मतमोजणीच्या आतापर्यंत 20 पैकी 12 फैऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांनी तब्बल 60,636 मतांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांना आतापर्यंत बाराव्या फेरीच्या अखेरपर्यंत 1 लाख 9 हजार 848 मते मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना केवळ 49 हजार 212 मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

लोकसभेचा वचपा काढला

बारामतीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बारामतीत नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद युगेंद्र पवार यांच्या बाजूने लावली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामतीत प्रचारासाठी ठाण मांडलं होतं. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय झाला आहे.

महाराष्ट्राचा निकाल काय?

महाराष्ट्र विधानसभेचा पूर्ण निकाल अद्याप स्पष्ट झालेला नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या कौलनुसार, महायुतीचे उमेदवार तब्बल 220 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर विजय मिळताना दिसतोय. तर इतर अपक्षांना 18 जागांवर यश मिळताना दिसतोय. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)