विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक सुप्त लाट होत्या. मराठा, ओबीसी वादाची किनार होती. तर लाडकी बहीण योजनेची साथ होती. या निवडणुकीत यंदा पक्षांची भाऊगर्दी झाली. महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगला असला तरी, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएम विरुद्ध भाजपा अशीच लढत होती. काँग्रेसने उमेदवारीची घोषणा करण्यात उशीर केला तर दुसरीकडे जो उमेदवार दिला तो पण ऐनवेळी बदलला. परिणामी अतुल सावे विरूद्ध इम्तियाज जलील अशी थेट लढत झाली. पण इतर अनेक घटकांनी या निवडणुकीत भूमिका बजावली आणि अतुल सावेंसमोर आव्हान म्हणता म्हणता त्यांनी ही निवडणूक खिशात घातली.
औरंगाबाद पूर्वमध्ये 60 टक्क्यांहून अधिक मतदान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा होता. पण गेल्या काही वर्षांपासून भाजपाने या ठिकाणी मांड ठोकली आहे. अतुल सावे हे दोन टर्मपासून पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची महायुतीत कॅबिनेट पदी सुद्धा वर्णी लागली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यावेळी 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी टफ फाईट दिली. पण अखेर अतुल सावे यांनी विजय खेचून आणला.
सर्व फॅक्टरची विजयासाठी बांधली मोट
अतुल सावे यांनी हॅटट्रिक साधली. त्यांच्या विरोधात मराठा कार्ड चालणार असे बोलले जात होते. त्यांची ओबीसी आंदोलकांना सुप्त सहानुभूती होती. तर मराठा आंदोलनाच्यावेळी ते फारसे दिसले नाही असा आरोप करण्यात येत होता. या मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची दोन-तीन वेळा भेट घेतली. त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.
त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार वगळून जलील विरुद्ध सावे असा सामना दिसून आला. मराठा फॅक्टर असला तरी या मतदारसंघात सावे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते कोणत्याही वादात अडकलेले नाही हे त्यांची जमेची बाजू ठरली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने वेळेवर उमेदवार बदलून अफसर खान यांना उमेदवारी दिली. एमआयएममधून बाहेर पडलेले डॉ. गफार कादरी हे समाजवादी पक्षाकडून या मैदानात उतरले. इतरही अनेक मुस्लिम उमेदवार होते. त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम मतांची मोट बांधता आली नाही. त्यात फाटाफूट दिसली. यामुळे सावे यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला.
काँग्रेसचे तळमळ्यात
महाविकास आघाडीत काँग्रेसने अगोदर माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. पण अचानकच काही तासात त्यांची उमेदवारी रद्द केली. त्यामागील कारणं गुलदस्त्यात राहिली. काँग्रेसने लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्यासाठी ही लॉटरी असली तरी या मतदारसंघात त्यांना प्रचाराला फार मोठा कालावधी मिळाला नाही. ओबीसी मतदारांनी सावे यांना भरभरून मतदान केल्याने त्यांचे पारडे जड झाले.
औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting
विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE
महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage